सिडकोतील अभियंतानगरमधील एक इमारतीच्या भिंतीवर पक्ष्यांच्या विष्ठेतून पिंपळाचे झाड उगविले होते. ते दीड दोन वर्षांचे झाले. त्याने ड्रेनेज पाइपलाही वेढा घातला. भविष्यात झाडाचा इमारतीला धोका निर्माण होईल यासाठी ते काढायचे ठरले. कमी अधिक फरकाने शहरातील इमारतीत हे चित्र दिसते. यातून झाडांची बाल्यावस्थेत कत्तल होत असल्याने नेचर क्लब ऑफ नाशिकच्या पुढाकारातून देशी झाडे वाचविण्यासाठी ‘ट्री रेस्क्यू’ मोहीम हाती हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमातून ५० देशी झाडे वाचविण्यात यश आले असून त्यांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे.

नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने दोन वर्षांपासून ‘ट्री रेस्क्यू’ पथक तयार करून भिंतीवरील वड, पिंपळाची रोपे जिवंत काढून त्याचे पुन्हा रोपण करण्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत ५० रोपे वेगवेगळ्या इमारतीतून काढण्यात आली. अभियंतानगर येथील इमारतीत पिंपळाचे मूळ भिंतीतून बाहेर आले होते. प्रथम त्या जागेचा अभ्यास करण्यात आला. मोठी शिडी आणून संस्थेचे ज्येष्ठ सदस्य भीमराव राजोळे रोपाजवळ पोहोचले.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

छन्नी व हातोडय़ाच्या साहाय्याने तासाभराच्या मेहनतीनंतर झाडाच्या मुळांना धोका न पोहचता ते भिंतीतून काढण्यात आले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा, सागर बनकर, आशीष बनकर, आकाश जाधव, अभिषेक रहाळकर आदींनी सहकार्य केले.

हे झाड काढल्यानंतर संस्थेतर्फे सुरू असलेल्या पक्ष्यांच्या शाळेत अर्थात संत गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरात त्याचे पुनरेपण करण्यात आले. त्याची देखभाल संस्था करणार आहे. शहरात अनेक इमारतींवर अशी वड, पिंपळाची शेकडो झाडे उगविलेली आहेत.

सोसायटीच्या सदस्यांना एकत्र येऊन सर्वांच्या मदतीने ती काढून मंदिरात किंवा मोकळ्या मैदानात लावता येतील. शहरात देशी वृक्षांचे प्रमाण कमी होत आहे, पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून ही रोपे उपलब्ध करून दिली आहे. आपण या रोपांचे रोपण करून हरित नाशिकचे स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो, असा विश्वास आनंद बोरा यांनी व्यक्त केला. रोपे काढण्याच्या मार्गदर्शनासाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.