संजय चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी

आदिवासी विकास भवन येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीच्या महिला अधिकाऱ्यास माजी आमदार संजय चव्हाण यांनी शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद बुधवारी उमटले. आदिवासी विकास विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले. उपरोक्त प्रकरणात संबंधित माजी आमदारावर अ‍ॅट्रोसिटी कलमांन्वये गुन्हा दाखल करावा, संबंधित महिला अधिकाऱ्यास पोलीस संरक्षण द्यावे, आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी मागणी आंदोलकांनी केली. दिवसभर चाललेल्या आंदोलनामुळे मुख्यालयाचे कामकाज ठप्प झाले.

मंगळवारी दुपारी आदिवासी मुख्यालयातील अपर आयुक्तांच्या दालनात हा प्रकार घडल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्याशी निगडित काही माहिती आ. दीपिका चव्हाण यांचे पती माजी आमदार संजय चव्हाण यांनी मागितली होती. ही माहिती मिळत नसल्यावरून ते थेट अपर आयुक्तांच्या दालनात शिरले. माहिती का दिली जात नाही, असा प्रश्न करत महिला अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करत गोंधळ घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी माजी आमदार चव्हाण यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. माजी आमदार चव्हाण यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द ठरविल्याचे सांगितले जाते. यामुळे त्यांच्याविरुद्ध उपरोक्त गुन्हा दाखल होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अरेरावीला आदिवासी मुख्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना नेहमी तोंड द्यावे लागते. संबंधितांचा शासकीय कार्यालयांमध्ये हस्तक्षेप वाढला आहे.

अनेकदा हुज्जत घातली जाते. कधीकधी धक्काबुक्कीही होते. या सर्व घडामोडींचे पडसाद बुधवारी उमटले. सकाळी अधिकारी-कर्मचारी काळ्या फिती लावून मुख्यालयाच्या आवारात जमले. काम बंद आंदोलन पुकारत त्यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या देत चव्हाण यांच्या दादागिरीचा निषेध नोंदविला. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे अधिकारी-कर्मचारी भीतीच्या सावटाखाली आहेत. आदिवासी विकास भवनच्या मुख्यालयात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याकडे लक्ष वेधण्यात आले. दिवसभर हे आंदोलन सुरू राहिल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले. गेल्या काही दिवसांपासून बनावट आदिवासी आणि खरे आदिवासी यावरून वाद सुरू आहे. उपरोक्त घटनेमुळे हा वाद पुन्हा उफाळून आल्याची चर्चा मुख्यालयात सुरू होती.

आदिवासी संघटना मोर्चा काढणार

आदिवासी विकास भवन कार्यालयात माजी आमदाराकडून महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ झाल्याच्या घटनेनंतर विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. महिला अधिकाऱ्याला झालेली शिवीगाळ, बनावट आदिवासींवर कारवाई, आदिवासी बांधवांशी निगडित विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खा. हरिश्चंद्र चव्हाण आणि पिचड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आदिवासी संघटनांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी घडलेल्या घटनेच्या संदर्भात पोलीस आयुक्तालयात निवेदन दिले.