अंगुलगाव येथील पाझर तलावांमध्ये उपक्रम

येवला : तालुक्यातील अंगुलगाव येथे पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे दोन महिन्यापूर्वी हैदराबाद  येथून मत्स्य बीज आणून येथील पाझर तलावांमध्ये सोडले होते. आता माशांची वाढ झाल्याने आदिवासी बांधवांनी अंगुलगावच्या अहिल्यादेवी होळकर पाझर तलाव, जिजामाता पाझर तलाव ,रमाबाई पाझर तलाव या ठिकाणी मासेमारीस सुरुवात करण्यात आली.

पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते मासेमारीला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांना तालुक्याच्या पूर्व भागातील आदिवासी बांधव मोठय़ा प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतरित होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी स्थानिक ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध होईल, याविषयी उपाय शोधण्यास सुरुवात के ली.

आदिवासी ऊसतोड किंवा वीटभट्टीच्या कामासाठी पुणे, सातारा या भागांमध्ये आपले कुटुंब घेऊन स्थलांतरित होत होते. २०१३ मध्येही गायकवाड यांनी हैदराबाद  येथून मत्स्यबीज आणून पाझर तलावांमध्ये सोडले होते. तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे ३५० आदिवासी कुटुंबांना मासेमारीमुळे रोजगार उपलब्ध होईल, असे गायकवाड यांना वाटत होते.

गायकवाड यांचे स्वप्न पूर्ण झाले असून सध्या येवला तालुक्याच्या पूर्व भागातील १५ ते १६ पाझर तलावांमध्ये येथील स्थानिक आदिवासी मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. त्यांना चांगल्या पद्धतीने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार मिळाला आहे. आदिवासी बांधव हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत असून त्यांना यामधून चांगले पैसेही मिळत आहेत.

गावातच रोजगार उपलब्ध झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणात आदिवासी बांधवांना रोजगारनिर्मिती झाली असून त्यांचे स्थलांतरही थांबले आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण स्थलांतरामुळे थांबत असे. आता ते गावातच पूर्ण होत आहे. अंगुलगाव येथे मासेमारीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी रमेश सोनवणे, शिवाजी गायकवाड, गणेश सोनवणे, कैलास काळे आदी उपस्थित होते.