एकलव्य विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सुरगाणा तालुक्यातील अलंगुण गावच्या मालती भोये या आदिवासी विद्यार्थिनीची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) ‘उडान’ योजनेंतर्गत निवड झाली आहे. राज्यातून निवड झालेल्या २४ विद्यार्थिनींपैकी ती एकमात्र आदिवासी विद्यार्थिनी आहे.
मालती पेठरोड येथील एकलव्य विद्यालयात बारावीत शिक्षण घेत आहे. या शाळेत ती इयत्ता सहावीत दाखल झाली. वडिलांनी चारही मुलांना शिक्षण दिले. मोठय़ा मुलीने अभियांत्रिकीची तर दुसरी मुलगी कला शाखेतून पदवीधर. तर मुलगा डी.एड्. झाला असून विज्ञान शाखेतील पदवीचे शिक्षण घेत आहे. ही परंपरा पुढे नेताना तिसरीपासून बाहेर शिक्षण घेत असलेल्या मालतीने शिक्षणात मोठे उद्दिष्ट गाठण्याची इच्छा बाळगली. तिच्या इच्छेला खतपाणी घालण्याचे काम ‘एकलव्य’मधील शैक्षणिक वातावरणाने केले. आदिवासी मुला-मुलींसाठी नाशिकसह अन्य काही भागांत एकलव्य विद्यालय सुरू करण्यात आले. दहावीला विज्ञान आणि गणित विषयात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्याने मालतीने ‘उडान’ योजनेत निवड होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरला. देशातील निवडल्या जाणाऱ्या हजार मुलींमध्ये तिची निवड झाली. महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे केंद्रातून निवडल्या गेलेल्या २४ मुलींमध्ये ती एकमात्र आदिवासी मुलगी आहे. या योजनेंतर्गत गुणवत्तेच्या आधारावर सर्व संवर्गातील मुलींमधून निवड होत असल्याने या निवडीला विशेष महत्त्व आहे. आयआयटीमध्ये मुलींचे प्रमाण वाढावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘उडाण’अंतर्गत प्रत्येक शनिवार, रविवारी या मुलींना रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र इ. विषयांचे ऑनलाइन मार्गदर्शन केले जाते. या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या टॅबच्या साहाय्याने तिचा अभ्यास सुरू असतो. ‘एकलव्य’ने आत्मविश्वास दिला, हे मालती आवर्जून सांगते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2016 5:09 am