‘सावाना’ च्या कार्यक्रमात मान्यवरांची श्रद्धांजली
अरूण टिकेकर हे सामाजिक प्रश्नावर विचार करणारे पत्रकार होतेच, शिवाय उत्तम ग्रंथकारही होते. जोर विचारांमध्ये नव्हे, तर विचारात असला पाहिजे यावर श्रद्धा ठेवणारे टिकेकर हे ज्ञानमार्गी, ग्रंथकार आणि लिहिते संपादक होते, अशी भावना येथे सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्र मंडळातर्फे आयोजित ‘स्मरण अरूण टिकेकरांचे’ या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली.
सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे, प्रा. अनंत येवलेकर, वंदना अत्रे, अपर्णा वेलणकर आदींनी टिकेकर यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. वेलणकर यांनी टिकेकर लिखित ‘पराभूतांची पिढी’ या लेखातील काही उतारे वाचून दाखविले. तनपुरे यांनी ‘लोकसत्ता’तील निरोप सोहळ्यावेळची टिकेकरांची आठवण कथन केली. आधी संशोधक व नंतर पत्रकार असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, असेही त्यांनी नमूद केले. टिकेकर हे आर्थिक उदारीकरणाच्या काळातील संपादक होते. त्यांचा मूळ पिंड हा ग्रंथकर्त्यांचा होता. टिकेकर लोकांमध्ये फारसे मिसळले नाहीत; परंतु त्यांचा एकांत ग्रंथांच्या सहवासात फुलायचा. त्यांनी पत्रकारितेत वैचारिकता टिकवून ठेवली. संशोधनावर त्यांनी अधिक भर दिला. ‘शहर पुणे’ हा ग्रंथ त्यांच्या संशोधनवृत्तीचे उत्तम उदाहरण असल्याचे येवलेकर यांनी नमूद केले. कोणत्याही प्रश्नाबाबत टिकेकर यांच्याशी चर्चा केली तर उत्तर सापडायचे, अशी आठवण वेलणकर यांनी सांगितली.
संभ्रमाची हाताळणी कशी असावी हे त्यांच्याकडून शिकायला मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सावानाच्या पुस्तक मित्र मंडळाचा बंद पडलेला उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला असून त्याची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार वंदना अत्रे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मिलिंद जहागीरदार यांनी दिली.