News Flash

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती बदलण्यावरून मतभेद

बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

 

पुरातत्व विभागाने मान्यता दिल्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या मुख्य गर्भगृहातील पार्वती मातेची मूर्ती झीज झाल्यामुळे लवकरच बदलण्यात येणार आहे. मूर्ती बदलण्याच्या मुद्यावरून देवस्थान व तुंगार ट्रस्ट यांच्यात मतभेद निर्माण झाले असून पुरोहित संघाने या वादात न पडण्याचे ठरवले आहे. देवस्थानने पुरातत्व विभागाशी त्या अनुषंगाने कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचे म्हटले आहे. मूर्ती बदलण्यापेक्षा तिची झीज करणाऱ्या कारणांचा विचार करून ती रोखण्यासाठी कृती करावी, असे आवाहन देवस्थानने केले आहे.

बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात पश्चिम बाजूला कोपऱ्यात संगमरवराची दीड ते पावणे दोन फूट आकाराची पार्वती मातेची मूर्ती आहे. या मूर्तीला हळद, कुंकूसह प्रसाद लावला जात असल्याने तिची काही अंशी झीज झाली आहे. ही मूर्ती बदलण्यात यावी यासाठी तुंगार ट्रस्ट आग्रही आहे. देवस्थानसह पुरातत्व विभागाकडे त्यांनी सातत्याने या मागणीसाठी पाठपुरावा केल्यानंतर पुरातत्व विभागाने मूर्ती बदलण्यास परवानगी दिली. पुरोहित संघाने मूर्ती बदलणे किंवा मूळ मूर्ती ठेवणे हा विषय देवस्थान आणि पुरातत्व विभागाशी संबंधित असल्याने त्या वादात पुरोहित संघाला पडण्याचे कारण नसल्याचे संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी सांगितले.

दरम्यान, या संदर्भात देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संपर्क साधला असता त्यांनी देवस्थानने मूर्ती बदलण्याबाबत पुरातत्व विभागाशी कधीही संपर्क साधला नाही किंवा कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचे सांगण्यात आले. अतिप्राचीन पार्वती मातेच्या मूर्तीची झीज झाली या कारणास्तव ती बदलण्यात येत आहे.

दही दुधाच्या अभिषेकाने मूळ त्र्यंबकराजाच्या मूर्तीची कितीतरी पटीने झीज झाली. मग ती देखील आता बदलणार का, असा प्रश्न देवस्थानचे त्रिकालपूजक डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी केला. मूर्ती बदलण्याचा अधिकार किंवा मंजुरी देण्याचे अधिकार पुरातत्व विभागाला दिलेच कोणी, कुठल्या निकषाद्वारे ते मूर्ती बदलत आहे याचा खुलासा करावा. तसेच मूर्ती बदलण्यापेक्षा तिची झीज होणार नाही याची तजवीज करावी याकडे लक्ष वेधले. याबाबत तुंगार ट्रस्टशी संपर्क होऊ शकला नाही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:28 am

Web Title: trimbakeshwar ancient idol changing issue
Next Stories
1 बेशिस्त वाहनधारक विद्यार्थ्यांविरोधात कारवाई
2 गोणी पद्धतीच्या कांदा लिलावाविरोधात रास्ता रोको
3 नाशिकमध्ये पादचाऱ्यांसाठी आता सिग्नलवर ‘सायरन’
Just Now!
X