ग्रहण काळात पाणी पुरवठा बंद, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून निषेध

नाशिक : एकिकडे देशातील शास्त्रज्ञ चांद्रयान मोहीम पुन्हा कशी करता येईल, याविषयीच्या कामात व्यग्र असतांना दुसरीकडे देशातील अनेक जण अजूनही अंधश्रद्धेच्या जोखडाखालीच असल्याचे उदाहरण गुरूवारी सूर्यग्रहणानिमित्त पाहावयास मिळाले. धार्मिक नगरी असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा ग्रहण काळात बंद ठेवण्याचा प्रकार केला. पाण्याच्या नियोजित वेळेत बदल करत ग्रहण सुटल्यानंतर शहरात पाणी पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे या कृतीचे नगराध्यक्षांनी समर्थन केले आहे.

धार्मिकदृष्टय़ा त्र्यंबकेश्वर संपूर्ण देशात प्रसिद्ध असून नारायण नागबळीसारख्या विधीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. त्यामुळे संपूर्ण नगरीवर धार्मिकतेचा पगडा असून त्यातून नगरपालिकेचे अधिकारीही सुटलेले नाहीत. ग्रहण काळात त्र्यंबकेश्वर शहरात पूजा, स्नानविधी यासारखे धार्मिक विधी गृहित धरण्यात आले होते. परंतु, पालिकेने त्यापुढील पायरी गाठली. नगरसेवकांमार्फत गुरूवारी ग्रहण काळात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती बुधवारीच देण्यात आली होती. शिवाय नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रहण सुटल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. गुरूवारी सकाळी आठ ते ११ या वेळेत ग्रहण होते. त्र्यंबकेश्वर परिसरात ढगाळ वातावरण असल्याने  ग्रहण दिसले नाही. परंतु, नगरपालिकेने नियमितपणे पहाटे पाच ते सात या वेळेत होणारा पाणी पुरवठा ग्रहणाची वेळ संपल्यानंतर सुरु केला. या सर्व प्रकाराचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध केला असून पालिकेच्या कृतीवर आक्षेप नोंदविला आहे. अंधश्रद्धेस खतपाणी घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच कारवाई न झाल्यास पालिकेविरूद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्र्यंबक शहर अध्यक्ष दिलीप काळे यांनी दिला आहे.

त्र्यंबकेश्वर हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. त्र्यंबक नगरीत दररोज सकाळी होणारा पाणी पुरवठा ग्रहण सुटल्यानंतर करण्यात आला. धर्म हा विज्ञानावर, निसर्गावर अवलंबून आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्माकडे पाहणाऱ्यांची श्रद्धा असते. ज्यांची ही श्रद्धा आहे, ते त्याचे पालन करतात. याच भावनेतून ग्रहणाच्या दिवशी हजारो भाविकांनी कुशावर्त तीर्थात स्नान केले. ज्यांना अंधश्रद्धा वाटते, ते पालन करीत नाहीत. लोकशाहीत त्यांना तो अधिकार आहे. श्रद्धा या शब्दातून अंधश्रद्धेचा जन्म झाला आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाणी पुरवठय़ाविषयी घेतलेल्या आक्षेपांमध्ये तथ्य नाही.

– पुरूषोत्तम लोहगावकर, नगराध्यक्ष, त्र्यंबक नगरपालिका