न्यायालयात याचिका दाखल
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात स्वराज्य संघटनेच्या महिलांनी बुधवारी पुन्हा प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवस्थान प्रशासनाने त्यांना नियमांची माहिती दिली. परंतु, महिला मागे हटण्यास तयार नव्हत्या. या घडामोडींमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दुसरीकडे भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेने येथील दिवाणी न्यायालयात त्र्यंबकेश्वर मंदिरात पुरुषांप्रमाणे महिलांनादेखील प्रवेश मिळावा म्हणून याचिका दाखल केली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना परवानगी मिळाल्यानंतर महिला संघटना त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी देवस्थानने या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले. गेल्या शनिवारी पुणे येथील स्वराज्य संस्थेच्या वनिता गट्टे यांच्या नेतृत्वाखाली काही महिलांनी गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली. साधारणत: ३० ते ३५ महिला दर्शनासाठी आल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करू लागल्या. यावेळी देवस्थान व्यवस्थापनाने गर्भगृहात प्रवेश करण्याविषयीच्या नियमांची माहिती दिली. महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याबाबत देवस्थान लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे काही दिवस प्रतीक्षा करावी, अशी विनंती करण्यात आली. परंतु, महिला ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. या महिलांना मंदिराच्या प्रवेशद्वारालगत रोखून धरण्यात आले. दरम्यान, महिलांच्या प्रवेशासाठी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश मिळावा, यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आल्याचे याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी सांगितले.