पूजा-विधीचा खर्च अर्थात दक्षिणा स्वीकारताना चलन टंचाईमुळे उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितही रोकडरहित व्यवहारांकडे वळले आहेत. त्या दृष्टिकोनातून व्यवस्था उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्या अंतर्गत लवकरच त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ ‘स्वॅप’ यंत्रणा खरेदी करत आहे. नोटाबंदीनंतर त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांनी धनादेश, ‘आरटीजीएस’द्वारे खात्यात पैसे भरणे आणि इतकेच नव्हे तर पेटीएम व तत्सम अ‍ॅपद्वारे पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली. ज्या यजमानांना या व्यवस्थेमार्फत पैसे देणे शक्य नाही, त्यांच्याकरिता ‘स्वॅप’ यंत्राची सुविधा दिली जाणार आहे.

त्र्यंबकेश्वरमधील दोन पुरोहितांच्या कुटुंबीयांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकून छाननी हाती घेतली. या दोन्ही कुटुंबातील काही निवडक व्यक्तीच पौरोहित्य करतात. उर्वरित सदस्यांचे विविध व्यवसाय आहेत. यामुळे या कारवाईचा संबंध त्र्यंबकमधील सर्व पुरोहितांशी जोडणे योग्य नसल्याचे त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे म्हणणे आहे. त्र्यंबकमध्ये जवळपास ३०० पुरोहित आहेत. त्यातील बहुतांश नियमितपणे प्राप्तिकर भरत असल्याचा दाखलाही पुढे केला जात आहे.

१२ ज्योतिर्लिगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येतात. या ठिकाणी जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि अंतक्रियेनंतरचेही धार्मिक विधी केले जातात. नारायण नागबली, त्रिपिंडी, अभिषेक पूजा, कालसर्प व यज्ञयाग असे काही विशेष विधी करण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून भाविक त्र्यंबकमध्ये मोठय़ा संख्येने येतात. या पूजाविधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी वेगवेगळी चर्चा नेहमी होत असते. त्र्यंबकचा आर्थिक गाडा हा पर्यटक व भाविकांच्या येण्या-जाण्यावर अवलंबून आहे.
मागील काही वर्षांत या गावात पुरोहितांच्या आर्थिक उत्पन्नाची प्राप्तिकर विभागाने चौकशी केलेली नाही. १९९२-९३ मध्ये प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याच्या सूचनेवरून गावातील सर्व व्यावसायिक, पुरोहित आदींना ‘पॅन कार्ड’ काढून विवरण पत्र सादर करण्याची सूचना केली होती. तद्नंतर पुढील काळात बहुतेकांनी आपले व्यवहार कागदपत्रांवर आणल्याची बाब ज्येष्ठ पुरोहितांनी कथन केली.

नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर इतरांप्रमाणे त्र्यंबकला झळ सहन करावी लागली. रात्रीत निर्णय जाहीर झाल्यामुळे पूजाविधी व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रद्दबातल नोटांशिवाय आधार नव्हता. परिणामी, प्रारंभीच्या काळात पुरोहितांना ५०० व एक हजारच्या जुन्या नोटा स्वीकारणे भाग पडले. परंतु, नंतर रोकडरहित व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ज्या भाविकांना रोख रक्कम देणे अशक्य होते, त्यांच्याकडून पूजाविधीचे पैसे धनादेशामार्फत स्वीकारण्यात आले. काही यजमानांनी ‘आरटीजीएस’द्वारे ही रक्कम पुरोहितांच्या बँक खात्यात वर्ग केली. त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित वर्ग सुशिक्षित आहे.

नव्या पिढीने पेटीएम व तत्सम अ‍ॅपच्या साहाय्याने ही रक्कम स्वीकारण्यास प्राधान्य देऊन रोकडरहित व्यवहारांकडे लक्ष केंद्रित केल्याचे पुरोहित वर्ग सांगतो. काही पुरोहित यजमानांना प्रत्येक पूजाविधीच्या खर्चाची रीतसर पावती देतात. भाविक अर्थात यजमानांच्या सुविधेसाठी स्व्ॉप कार्डची लवकरच व्यवस्था केली जाणार असल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी सांगितले.

रोकडरहित व्यवहार प्रत्यक्षात आल्यावर प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद होईल. जेणेकरून कर चुकवेगिरी वा तत्सम प्रकारांना पायबंद बसेल असे काहींनी नमूद केले.

दानाबाबत समज-गैरसमज

पूजाविधीनंतर यजमानांकडून काही रक्कम दान स्वरूपात पुरोहितांना दिली जाते. दानापोटी मिळालेल्या रकमेवर कर द्यावा लागत नसल्याचे अनेक पुरोहितांचे म्हणणे आहे. तथापि, अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दानाच्या स्वरूपात मिळणाऱ्या रकमेस कर सवलतीची मर्यादा केवळ पाच हजार रुपये आहे. म्हणजे, पाच हजार रुपयांहून अधिक दानाच्या स्वरूपात जे काही उत्पन्न मिळेल, त्यावर नियमानुसार कर आकारणी होऊ शकते. तसेच हे दान कोणत्या व्यक्तीकडून मिळाले त्याची नोंद पुरोहितांना ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजे केवळ पुरोहित नाही तर दानापोटी पैसे देणाऱ्या व्यक्तीवर नजर ठेवण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रयत्न आहे.