पालकमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

घरकूल योजनेच्या अमलबजावणीत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. ग्रामीण भागात विविध घरकूल योजनांच्या माध्यमातून २१ हजार कुटुंबांना घरकूल उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात  स्वातंत्र्याच्या  वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण तसेच राष्ट्रपतीपदक प्राप्त करणारे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी महाजन यांनी जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना वीज जोडणी आदी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानातंर्गत दोन वर्षांत ४४७ गावे जलसमृद्ध झाली. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून एक लाख ४९  हजार शेतकऱ्यांना ७९३ कोटी २९ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत २६ प्रकल्पांना १६ हजार ६३३ कोटी आणि बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून ८३ प्रकल्पांना सुमारे १७ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.

या कामांमुळे राज्यातील सिंचन व्यवस्थेचे चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर्षी पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि लोकसहभागातून अधिकाधीक पाणी अडविण्यात यावे, असे आवाहन महाजन यांनी केले.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, योगेश घोलप,  पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आदी उपस्थित होते.

विविध पुरस्कारांचे वितरण

पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते शिष्यवृत्ती, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. स्मार्ट ग्रामयोजनेंतर्गत अवनखेड, डांगसौंदाणे, सावकी, शिरसाने, जळगांव नेऊर, बोरवठ, वाडीवऱ्हे, विंचुरदळवी, भैताने, शिंदे (दिगर), खायदे, माळेगाव, लहवित आणि शिंदे (विभागून), आमोदे या ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय तसेच अवनखेडला जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७-१८ अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पारितोषिक अवनखेड, राजदेरवाडी, आणि बोराळे या ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, सहाय्यक उपनिरीक्षक बाळु भवर, अरुण अहिरे, अरिफखा पठाण, सुभाष जाधव यांना सन्मानित करण्यात आले. महाजन यांच्या हस्ते नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.