आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कृती

शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांची विलक्षण धडाडीची कार्यपध्दती दाखवून दिली. शुक्रवारी सकाळी १० च्या ठोक्याला महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार मुंढे यांनी स्वीकारला. विभाग प्रमुखांकडून बैठकीत आढावा घेताना गणवेश, पदनाम चिन्ह आणि टोपी परिधान न केलेल्या अग्निशमन दलाच्या प्रमुखांना बाहेर काढत मुंढे यांनी शिस्त म्हणजे काय, याचा पहिला धडा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला.

शहरातील मिळकती आणि तत्सम बाबींची काहींनी अंदाजे उल्लेख करीत माहिती दिली. अंदाजे या शब्दावर  आक्षेप घेत मुंढेंनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. तसेच सातही दिवस चोवीस तास आपले काम असून ते संवेदनशीतेने करायला हवे, असे ठणकावले. सत्ताधारी भाजपकडून अधिकारी वर्गावर दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याची व्यथा अधिकाऱ्यांनी मांडल्यावर यापुढे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचाही दबाव राहणार नसल्याचे स्पष्ट करत चुकीचे काम करणाऱ्यांची हयगय केली जाणार नसल्याचा इशारा दिला.

सत्ताधारी भाजपच्या दबाव तंत्रामुळे त्रासलेल्या आणि त्यामुळे स्वेच्छा निवृत्तीची मानसिकता बाळगणाऱ्या पालिकेतील काही अधिकाऱ्यांची मुंढे यांच्या आगमनानंतर दुहेरी कात्रीत सापडल्याची भावना झाल्याचे अधोरेखीत झाले. पुणे महानगर परिवहन महामंडळात सर्वपक्षीय नेत्यांशी संघर्ष करत धडाकेबाज कारवाई करणाऱ्या मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे सत्ताधारी भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता असताना त्यात पालिकेतील अधिकाऱ्यांची भर पडल्याचे पहावयास मिळाले.

पालिकेच्या कामकाजाची वेळ सकाळी १० ची असली तरी वेळेत कोणी अधिकारी, कर्मचारी येत नाहीत. वरिष्ठ अधिकारी दुपारी चारनंतर येतात. मुंढे यांनी सकाळी १० वाजताच पालिकेत येत वेळेचा शिरस्ता पाळल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. विभाग प्रमुखांची ओळख आणि आढावा बैठकीसाठी कार्यालयातून दूरध्वनी गेल्यावर सर्वाची धावपळ उडाली. एकामागोमाग एक अधिकारी आयुक्त कार्यालयात धडकू लागले. कार्यालयाबाहेरील पायपुसणीवरील धुळीवर मुंढे यांची नजर गेली. एका नळातील पाणी गळती निदर्शनास आली. पायपुसणीची स्वच्छता, नळ गळती तातडीने बंद करण्याची सूचना त्यांनी केली. साडे दहाच्या सुमारास सुरू झालेली विभागप्रमुखांची बैठक अडीच तास सुरू होती. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याची ओळख करून घेताना सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी मालमत्तेशी संबंधित माहिती देतांना एका अधिकाऱ्याने अंदाजे शब्द वापरला. तेव्हा आपल्याकडे आपल्या विभागाची अंदाजे नव्हे तर ठोस माहिती असायला हवी, असे त्यांनी सुनावल्याचे समजते. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थिती,  कचरा संकलनाची पध्दत आदींबाबत त्यांनी जाणून घेतले. पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाला लावलेली शिस्त नंतर काही काळ विस्कळीत झाल्याचे विलंबाने येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे लक्षात येते. शहरातील मूलभूत सुविधांची जबाबदारी सांभाळणाऱ्या पालिकेचे काम चोवीस बाय सात चालते. अधिकाऱ्यांनी त्याची जाणीव ठेवावी. कार्यालयीन वेळेचे पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. पालिका प्रशासन चांगले काम करते असे नागरिकांनी म्हणायला पाहिजे. चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करावा. नियमात जी कामे बसतात ती करण्यासाठी विचार करत बसू नका, असा सल्ला त्यांनी दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

महापालिकेची एकहाती सत्ता प्राप्त केल्यावर भाजपच्या काही नेत्यांकडून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा अवलंब केला जात असल्याची ओरड आहे. त्यास वैतागून आतापर्यंत आठ ते १० अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारणे पसंत केले. मुंडे आल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या जाचापासून मुक्तता होईल, अशी अधिकारी वर्गाची भावना आहे. बैठकीत अधिकाऱ्यांनी कोणाचा दबाव नको, अशी भावना मांडली. त्यावेळी मुंढे यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचाही दबाव राहणार नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, चुकीचे काम करणाऱ्यांची हयगय केली जाणार नसल्याचे बजावले.

कारवाईचा इशारा

नागरिकांना केंद्रबिंदू मानून पालिका प्रशासनाने काम करायला हवे.  सर्वसामान्यांचे काम सहजपणे कसे होईल याचा प्राधान्याने विचार करून काम करावे, असे निर्देश दिले. नागरिकांचे अर्ज, ठेकेदार किंवा लोकप्रतिनिधींच्या कामांचे प्रस्ताव, कागदपत्रे यांचा विहित मुदतीत निपटारा होणे गरजेचे आहे. अर्ज, फाईलच्या प्रवासावर पालिकेबाहेरील कोणी नजर ठेवायला नको. ही जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. बाह्य़व्यक्ती तसे करतांना आढळल्यास संबंधित विभाग प्रमुख किंवा कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशाराही मुंढे यांनी दिला.

‘गणवेश घालून या’

बैठकीत मुख्य अग्निशमन अधिकारी अनील महाजन गणवेश, पदनाम चिन्ह आणि टोपी परिधान न करता आले होते. ते लक्षात आल्यावर मुंढे यांनी त्यांना पूर्ण गणवेशात येण्यास बजावले. गणवेशधारी अधिकाऱ्यांनी शिस्तबध्दपणे काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आयुक्तांच्या निर्देशानंतर बैठकीतून बाहेर पडलेले अग्निशमन अधिकारी आपल्या मोटारीत ठेवलेले पदनाम चिन्ह, टोपीसह पूर्ण गणवेशात पुन्हा १० मिनिटात प्रगट झाले.