तुकाराम मुंढे यांचा नवीन धक्का

महापालिकेतील अधिकाऱ्यांनी थेट प्रसार माध्यमांशी संवाद न साधता जनसंपर्क अधिकाऱ्यामार्फत माहिती द्यावी, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देत अधिकाऱ्यांना नवीन धक्का दिला आहे. आवश्यकता भासल्यास अधिकाऱ्यांना माध्यमांशी संवाद साधण्याची मुभा दिली जाईल, असे त्यांनी सूचित केले.

पहिल्या दिवशी आढावा बैठकीत गणवेश परिधान न करता आलेल्या अग्निशमन दलाच्या प्रमुखांना बाहेर काढत मुंढे यांनी शिस्तीचा पहिला धडा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला होता. स्वच्छतेच्या मुद्दय़ावरून मुंढे यांनी कान टोचले होते. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी मुख्यालयातील वेगवेगळ्या विभागात जाऊन पाहणी केली होती. त्या वेळी अस्ताव्यस्त पडलेले फाईलचे गठ्ठे, कपाटांमध्ये कोंबलेली कागदपत्रे, छतावरील जळमटे पंखा, टेबल अन् संगणकावर धूळ पाहावयास मिळाली. बहुतांश विभागातील कामाचा गलथानपणा उघड झाला. टपालाच्या आवक-जावकची नोंद नसणे टिपण्णी योग्य पद्धतीने न ठेवणे, कामाच्या सद्य:स्थितीची माहिती दर्शविणाऱ्या कागदपत्राचा अभाव समोर आला. या सर्वाची गंभीर दखल घेत मुंढे यांनी विभाग प्रमुखांना धारेवर धरत दोन दिवसात सर्व नीटनेटके करण्याचे निर्देश दिले होते.   शनिवार, रविवारी या सुटीच्या दिवशी पालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात सर्व विभागांमध्ये युद्ध पातळीवर स्वच्छतेचे काम करण्यात आले. आयुक्त कधीही पाहणी करतील, या धसक्याने प्रत्येक विभागात टापटीप केली गेली.

सोमवार हा आयुक्तांच्या कामकाजाचा दुसरा दिवस. आयुक्त कार्यालयात वेळेत येत असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहा वाजता दाखल होणे क्रमप्राप्त ठरले. सकाळी आयुक्तांनी खातेप्रमुखांची बैठक घेतली. याच बैठकीत यापुढे एकाही अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधू नये, असा त्यानी बजावले. प्रसारमाध्यमांशी आपण संवाद साधून माहिती देऊ. अधिकाऱ्यांना काही माहिती द्यावयाची असल्यास ती जनसंपर्क विभागामार्फत प्रसारमाध्यमांना द्यावी, असे त्यांनी सूचित केले. आयुक्तांच्या भूमिकेने अधिकारी बुचकळ्यात सापडले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास मुंढे यांनी बंदी घातल्याने बैठकीत नेमके काय घडले याची माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. माध्यमांशी संवाद साधण्यावर अधिकाऱ्यांना घातलेली बंदी ही पारदर्शक कामकाजाच्या विसंगत असल्याची बाब काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. काही वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी याच पद्धतीचा फतवा काढला होता. मुंढे यांच्या फतव्याने त्याची आठवण झाल्याची प्रतिक्रिया पालिका वर्तुळात उमटली.

पालिका अधिकाऱ्यांना जनसंपर्क विभागामार्फत माध्यमांना माहिती देण्यास सूचित करण्यात आले आहे. वेगवेगळे अधिकाऱ्यांनी वेगवेगळी माहिती दिल्यामुळे विसंगती निर्माण होऊ शकते. ही बाब टाळण्यासाठी पालिकेच्या अधिकृत व्यवस्थेचा वापर केला जाणार आहे. ज्या वेळी आवश्यकता भासेल, तेव्हा अधिकाऱ्यांना माध्यमांशी संवाद साधण्यास परवानगी दिली जाईल

      – तुकाराम मुंढे, आयुक्त, नाशिक महानगरपालिका