News Flash

विक्रेते, फेरीवाल्यांसह भाजपचेही तुकाराम मुंढे हेच लक्ष्य

भाजपचे नगरसेवकांमध्येही असंतोष निर्माण झाला.

तुकाराम मुंढे

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेऊन महिनाही पूर्ण होत नाही तोच तुकाराम मुंढे हे सत्ताधारी भाजपसह रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, सफाई कामगार यांचे लक्ष्य झाले असल्याचे दोन दिवसात पालिकेत आणि पालिकेबाहेर घडलेल्या घडामोडींवरून दिसून येत आहे.

मालमत्ता करात भाडेमूल्याच्या आधारे ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत करवाढीचा प्रस्ताव आयुक्त मुंढे यांनी महासभेत ठेवला होता. या प्रस्तावास सर्वच स्तरांतून विरोध होणे सुरू झाले. भाजपचे नगरसेवकांमध्येही असंतोष निर्माण झाला. सर्व प्रकारच्या असंतोषाची दखल घेत भाजपने मुंढेंचा प्रस्ताव फेटाळून लावत स्थायी समितीचा सरसकट १८ टक्के भाडेमूल्यावर आधारित करवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. आल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेत सळो की पळो करून सोडणाऱ्या मुंढेंना सत्ताधारी भाजपने दिलेली ही चपराक असल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे मुंढे आल्यापासून पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग भलताच कार्यप्रवण झाला असून दररोज कोणत्या ना कोणत्या भागात रस्त्यावरील विक्रेते, टपऱ्या, फेरीवाले यांसह दुकानांचे वाढीव बांधकाम उद्ध्वस्त करण्यात येत आहे. त्यासाठी शहर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचे कारण पुढे केले जात आहे. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून रस्त्यांवर निर्धोकपणे पथाऱ्या मांडणारे, हातगाडय़ा लावणारे आणि रस्त्याचा बराचसा भाग व्यापणाऱ्या विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पालिकेची ही कारवाई म्हणजे आपल्या पोटावरच पाय असल्याची त्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने शनिवारी पालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येऊन ‘मुंढे गो बॅक’च्या घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे या समितीचे नेते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल हे आहेत. फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते, टपरीधारकांच्या हिताविषयी महापौरांनी पर्याय काढण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करून फेरीवाला क्षेत्राविषयी फेरविचार करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते लक्षात न घेता प्रशासनाने फेरीवाला धोरणाची एकतर्फी अंमलबजावणी सुरू केल्याचे समितीच्या नेत्यांचे म्हणणे आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहर फेरीवाला समिती स्थापन करून या समितीतील सदस्यांच्या सूचनेप्रमाणे फेरीवाला क्षेत्र आखण्याची मागणी हॉकर्स-टपरीधारक कृती समितीने केली आहे. शहराला शिस्त लावण्यासाठी मुंढे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांविषयी सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी राजकीय आशीर्वादाने रस्त्यावर ऐसपैस व्यवसाय थाटणाऱ्यांना मुंढे यांच्या मोहिमेमुळे हादरा बसला असल्याने त्यांना विरोधासाठी रस्त्यावर उतरणे भाग पडले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

संदर्भ सेवा रुग्णालयाजवळ फेरीवाला क्षेत्रास विरोध

शहरातील शिवाजी रस्ता, शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाजवळ फेरीवाला क्षेत्रासाठी पालिका प्रशासनाकडून पट्टे मारून आखणी करण्यात येत असून परिसरातील नागरिकांनी त्यास विरोध केला आहे. विरोधासाठी शहर काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र बागूल यांनी काही कारणे दिली आहेत. त्यात विभागीय संदर्भ रुग्णालयामुळे हा भाग अतिदक्षतेचा आहे. हा भाग पूर्णपणे रहिवासी क्षेत्र आहे. अरुंद गसल्लीत फेरीवाले आणून येथे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. पाण्याची गाडी, अग्निशमन गाडी, शववाहिका, रुग्णवाहिका ये-जा करण्यास जागा राहणार नाही. सामाजिक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे येथे कोणत्याही परिस्थितीत फेरीवाला क्षेत्र करू नये, असी मागणी त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 2:42 am

Web Title: tukaram mundhe targeted in nashik by hawkers bjp nmc
Next Stories
1 भाजप-आयुक्त यांच्यात वादाची ठिणगी
2 ऑनलाइन नोंदणी न झाल्यास शस्त्र परवाना रद्द
3 कांदा विक्रीची रक्कम ‘आरटीजीएस’द्वारे द्यावी
Just Now!
X