नाशिक जिल्ह्यातील वणी-सापुतारा रस्त्यावर तीन सप्टेंबर रोजी करंजखेड फाट्यानजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात धनराज गावित (रा. करंजखेड) या युवकाचा मृत्यू झाला होता. मात्र या युवकाच्या नातेवाईकांनी यात घातपात असल्याचा संशय व्यक्त करत संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी दोघा संशयितांवर सुरगाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना घटना वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली की सुरगाणा हद्दीत घडली असा प्रश्न निर्माण झाला होता. वणी पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन न पाळल्याने करंजखेड फाट्यावर नागरिकांनी बुधवारी अडीच तास वाहतूक ठप्प केली होती. यावेळी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने दंगल नियंत्रण पथकास व राज्य राखीव दलाच्या तुकडीस घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी मयताची पत्नी संगिता गावित यांच्या फिर्यादीवरून पती धनराज गावित (रा.करंजखेड) याचा अपघात नसून, खून करण्यात आल्याने दोघा संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल केला. सराड शिवारात नागझरी फाटा ते हरणटेकडी रस्त्यावर ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी बंटी उर्फ निलेश गावित आणि त्याचा साथीदार भगवान भोये यांनी धनराज गावित यास मारहाण करत त्याची हत्या केली. पत्नीच्या फिर्यादीवरून दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.