सिन्नरच्या चिंचोली शिवारातील शेतजमीन बिनशेती करण्यासाठी लागणारा ना हरकत दाखला देण्याकरिता चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी नायगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक राजेंद्र पांडुरंग बैरागी आणि गणेश गोपीनाथ पालवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मागील काही दिवसात सिन्नर येथे लाचखोरांना पकडण्याची ही दुसरी घटना आहे. तक्रारदाराची सिन्नर तालुक्यातील चिंचोली शेतजमीन आहे. ही जमीन बिनशेती करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या ना हरकत प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने संबंधिताला नायगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यासाठी आरोग्य केंद्रात त्याने अर्जही केला होता. हे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्यसेवक राजेंद्र बैरागीने पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम चार हजार रुपये निश्चित झाली. दरम्यानच्या काळात तक्रारदारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार बुधवारी सापळा रचण्यात आला. नायगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रक्कम आरोग्यसेवक गणेश पालवेने स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पालवेसह बैरागीला अटक केली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.