१२५ तपासणी अहवाल प्रलंबित

मालेगाव : शहरातील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन करोना संशयित महिलांचा मृत्यू झाला आहे. एक महिला शहरातील आणि दुसरी महिला नांदगाव तालुक्यातील आहे. या महिलांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत प्रशासन आहे.

सोमवारी पहाटे या दोन महिलांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या दोन्ही महिलांना न्युमोनिया, श्वसन विकार, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय सूूत्रांनी दिली. यामध्ये ५८ वर्षांची महिला मालेगाव शहरातील आणि ४८ वर्षांची महिला नांदगाव तालुक्यातील आहे. या दोन्ही महिलांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे आतापर्यंत आढळून आलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि अन्य लोकांची व्यापक प्रमाणात शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

वेगवेगळ्या आरोग्य पथकांतर्फे संपूर्ण शहरभर संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार करोनासदृश्य लक्षणे आढळून येणाऱ्या लोकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून घेण्यात येत आहे.

‘त्या’ रुग्णांना सामान्य रुग्णालयात पाठवा!

करोनासदृश रुग्णांवर शहरातील खासगी डॉक्टरांकडून उपचार झाल्याचे आणि त्यामुळे गुंतागुंत निर्माण झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्याची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी सर्दी, ताप, खोकला अशी करोनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांवर शहरातील डॉक्टरांनी स्वत: उपचार न करता त्यांना थेट सामान्य रुग्णालयात पाठविण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासन अधिक कठोर

तब्बल ३० करोनाबाधित रुग्ण आढळून आले असतानाही शहरातील काही भागात लोकांचा मुक्त संचार सुरू असल्याबद्दल चौफेर टीका होऊ  लागल्यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासन आणखी सक्त झाल्याचे चित्र आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात संपूर्ण संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने कठोर उपाययोजना सुरू झाली आहे. रस्त्यांवर जागोजागी जाळ्या लावून लोकांना घराबाहेर पडण्यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे.