महिनाभर पावसाने पाठ फिरवली असली तरी महापालिकेने पूर्वतयारीचा भाग म्हणून शहरातील गटारी, नाले व चेंबर्सच्या साफसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. या वर्षी उपरोक्त कामांवर जवळपास दोन कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. नालेसफाईची ही कामे १० जुलैपर्यंत पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आहे. या सफाईतून नेमके काय साध्य झाले ते मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर लक्षात येईल.

मुसळधार पावसानंतर प्रमुख रस्ते आणि सखल भागात साचणारे पाणी गेल्या काही वर्षांत शहरवासीयांच्या परिचयाचे झाले आहे. केटीएचएम महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग, डोंगरे वसतिगृहासमोरील गंगापूर रोड वा कॉलेज रोड अशा उच्चभ्रू परिसरासह सखल भागातील झोपडय़ा, दुकान व घरे, अनेक इमारतींची तळघरे आदी पाण्याखाली जात असल्याचा अनुभव आहे. अनेक मार्गावरील दुभाजक पावसाचे पाणी वाहून नेण्यास अडथळा ठरतात. परिणामी एका बाजूला पाणी साचल्याने वाहतूक अन्य बाजूने दुहेरी चालविणे भाग पडते. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी शहरात नैसर्गिक नाल्यांसोबत पावसाळी गटार योजनाही कार्यान्वित आहे. पावसाळा पूर्वतयारी अंतर्गत रस्त्यालगतच्या गटारी, नाले, पावसाचे पाणी साचणारी संभाव्य ठिकाणे लक्षात घेऊन पालिकेच्या बांधकाम विभागाने सहा विभागांत जवळपास ४५ हून अधिक कामे हाती घेतली आहेत.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…
nhai postponed decision to increase toll tax
निवडणुकीचा वाहनचालकांना असाही दिलासा! आचार संहितमुळे वाढीव टोलमधून सुटका

नाशिक पूर्व विभागात गजानन महाराज मंदिरामागील नाला, बजरंगवाडी नाला, झोपडपट्टीतील गटारी, नाशिक पश्चिम विभागातील पंचशीलनगर, श्रमिकनगर झोपडपट्टी, सरस्वती नाला, मल्हार खान, कस्तुरबा नगर झोपडपट्टी, राजीव गांधी भवनमागील नाला, पंचवटी विभागातील वाघाडी, लेंडी, अरुणा नाला, मखमलाबाद शिंदे सव्‍‌र्हिस स्टेशनमागील नाला, रामवाडी नाला, नाशिकरोड विभागात चेहेडी नाला, भागवत नाला, लोट्स नाला व झोपडपट्टीतील गटारी, नवीन नाशिक विभागात औद्योगिक वसाहतीतील नाले, सेंट लॉरेन्स, पेलिकन पार्क, सद्गुरूनगर, सिद्धिविनायक, गुरुगोविंद सिंग, अंबड गावठाण येथील नाले, सातपूर विभागात पाटील नेस्ट व आनंदवल्ली सोमेश्वर नाला सफाईचे काम प्रगतिपथावर असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्यात बंदिस्त व उघडय़ा स्वरूपाचे नाले, गावठाणातील गटारी, पावसाचे पाणी साचून रहदारीस अडथळा निर्माण करणारे नाले आदींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालिकेची यंत्रणा व मनुष्यबळाचा वापर त्यासाठी केला जात असून आवश्यकतेनुसार नवीन कामे समाविष्ट केली जात आहेत.

नालेसफाईच्या कामांवर या वर्षी जवळपास दोन कोटींचा निधी खर्च होईल असा अंदाज आहे. गतवर्षी या कामांवर जवळपास दीड ते दोन कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. स्वच्छतेच्या कामांवर कार्यरत काही मनुष्यबळाचा वापर मुसळधार पावसाने कुठे पाणी साचणे वा तुंबण्याचा प्रकार घडल्यास करण्यात येणार आहे. पावसाळ्यात कुठेही पाणी साचू नये यासाठी विभागनिहाय पथक कार्यान्वित राहील. झोपडपट्टी व तत्सम भागात तसा प्रकार घडल्यास हे कामगार पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न करतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. संपूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेला. शहरात पावसाचे दमदार आगमन झाले नसल्याने पालिकेने पुढील दहा दिवसांत सफाईचे काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे.