एक गर्भवती, तर दुसरीवर बाळाला जन्म देण्याची वेळ

जिल्हा परिसरात अल्पवयीन मुलींना लग्नासह विविध आमिष दाखवित अत्याचाराचे प्रकार घडत आहेत. शहर परिसरात अशा अत्याचारातून एका अल्पवयीन मुलीने बाळास जन्म दिला, तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला.

शहर परिसरातील वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील एका महाविद्यालयामागे राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत संशयिताने तिच्या घरी वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले. यातून गर्भवती राहिलेल्या मुलीने अपत्याला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडित

बालिकेने औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा तपासासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

दुसरी घटना पेठ तालुक्यातील पवार पाडा येथील पीडित बालिकेबरोबर घडली. महिन्यापूर्वी पीडित १३ वर्षांची मुलगी गोवर्धनपाडा ते करंजाळी रस्त्यालगत असलेल्या धरण परिसरातून शाळेसाठी पायी चालली होती. त्यावेळी या मुलीच्या घरासमोरच राहणाऱ्या संशयित भरत किलबिले याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकीही त्याने दिली. मागील आठवडय़ात मुलीला मळमळ आणि पोटात दुखण्याचा त्रास जाणवू लागल्यावर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओटी पोटात सूज असल्याने तिची सोनोग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सोनोग्राफीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात ती दाखल झाली असता तपासणीअंती ती गरोदर असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तिला विश्वासात घेतल्यावर तिने झालेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पीडितेच्या आईने पेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.