करोना आढावा बैठकीत छगन भुजबळ यांची घोषणा

नाशिक : राज्यात ठिकठिकाणी करोनाचे रुग्ण आढळत असतांना नाशिकमध्ये अद्याप रूग्ण आढळलेले नाहीत. असे असले तरी लोकांमध्ये असलेली करोनाची धास्ती पाहता शिधापत्रिकेवर दोन महिन्याचे अन्न-धान्य दिले जाणार आहे. परंतु, नागरिकांनी कुठल्याही प्रकारची साठेबाजी किंवा व्यापाऱ्यांनी काळाबाजार करू नये. बाजारपेठा पूर्णत बंद करण्यापेक्षा त्या गर्दी टाळत सुरू कशा ठेवता येतील याचे नियोजन सुरू आहे. व्यापाऱ्यांनी याबाबत सहकार्य न केल्यास बाजारपेठ बंद केली जाईल, असा इशारा अन्न-नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करोना विषाणू संसर्ग साथ संदर्भात आयोजित आढावा बैठकीत भुजबळ  यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.

यावेळी भुजबळ यांनी करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणण्यात आली आहे. धर्मगुरूंनी लोकांना घरीच पूजा करावी, असे आवाहन करण्याची सूचनाही त्यांनी केली. विलगीकरण कक्ष सुरू असून बिटको रुग्णालय, तपोवन येथील रुग्णालय, देवळाली येथील रुग्णालय यासह अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. औषध तसेच अन्य व्यवस्थेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील १५ दिवस आपल्याला अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाश्यांच्या खबरदारीसाठी उपाययोजना सुरू आहेत. रेल्वे स्थानक परिसरातही रेल्वेकडून आरोग्य कक्ष सुरू करण्यात आले आहेत. विमानतळ परिसरातून तपासणी केल्याशिवाय विदेशातून आलेल्या नागरिकांना इतरत्र सोडले जात नाही. लोकांच्या काही तक्रारी, शंका असल्यास, हातावर शिक्का असलेला विदेशी प्रवासी, स्थानिक जर दिसून आला तर त्याविषयी १०४ तसेच १०० क्रमांकावर थेट तक्रार करावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

विभागीय आयुक्त माने यांनी विदेशातून नाशिकमध्ये आलेल्या संशयितांना काही त्रास नसला तरी १४ दिवस घरीच थांबावे, अशी सूचना करण्यात आली असल्याचे सांगितले. विमानतळावर संपूर्णत तपासणी करत विलगीकरण कक्षात किंवा घरी ‘विलगीकरण’ साठी पाठविण्यात येत आहे. त्यांनी इतरत्र कुठेही बाहेर फिरू नये असे आवाहन माने यांनी

केले. नागरिकांनी खबरदारी बाळगावी. पुढील १५ दिवसात ही साखळी खंडित झाली तर चित्र वेगळे असेल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.