23 September 2020

News Flash

शहरात २४ तासांत २ खून

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रतिकात्मक छायाचित्र

शहरात उत्सवाचे वातावरण असताना अवघ्या २४ तासांत सातपूर व भद्रकाली परिसरात किरकोळ वाद व पूर्ववैमनस्यातून दोन जणांची हत्या झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. भद्रकाली भागात घडलेल्या घटनेप्रकरणी संशयितास ताब्यात घेण्यात आले तर सातपूरच्या प्रकरणातील संशयित अद्याप हाती लागलेले नाहीत.

सातपूर येथील घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे निष्पन्न झाले आहे. धनराज ऊर्फ कुणाल परदेशी (३२) हा जगतापवाडी भागात खाद्यपदार्थाची गाडी चालवत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या संशयित भूषण कदम, नरेंद्र ठाकूर, अजिंक्य गायकवाड यांच्यासोबत त्याचे वाद सुरू होते. या वादातून संशयितांनी त्याच्या हत्येचा कट रचला. रविवारी रात्री काम आटोपल्यावर या टोळक्याने परदेशी याला आंबेडकर चौकात बोलावले. मागील भांडणाची कुरापत काढत त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यातील काही संशयितांनी परदेशीवर चॉपरने वार करत त्याची हत्या केली.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धनराज परदेशीला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

भद्रकाली परिसरात किरकोळ कामे करत उदरनिर्वाह करणारे संपत काशिनाथ दराडे (२६, रा. दिंडोरी) आणि संशयित गणेश जाधव (२६, रा. त्र्यंबक) सोमवारी नेहमीप्रमाणे कामावर आले. संपत व गणेश यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत असत. दोघांना नशापाणी करण्याची सवय होती. नशेत संशयित गणेशने संपतला शिवीगाळ केली. यातून वादाला सुरुवात झाली. या वेळी राग अनावर झाल्याने गणेशने काचेची बाटली फोडून ती संपतच्या पोटात खुपसली. घाव वर्मी बसल्याने संपत जागीच कोसळला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सणोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी अधिकचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. या स्थितीत चोवीस तासांत खुनाच्या दोन घटना घडल्याने शहरवासीयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 2:51 am

Web Title: two murders in 24 hours shock nashik city
Next Stories
1 आता पोलीस आयुक्तालयासमोरही हाणामारी
2 सिडकोत वीज धक्क्यांची भयमालिका
3 नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी
Just Now!
X