मुसळधार पावसात धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदी काठावरील भागात निर्माण होणारी पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ लाख रुपये खर्चून दोन रबरी बोटींची खरेदी केली आहे. नागरिकांना सुरळीत स्थळी हलविणे व पूरग्रस्तांपर्यंत अन्नपदार्थ व औषध पोहोचविण्यास या बोटीची मदत होणार आहे.

मागील आठ वर्षांत नाशिकला दोन वेळा महापुराचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात अल्पावधीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे धरणांमधून पाणी सोडणे भाग पडत असून गेल्या काही दिवसांत गोदावरी, दारणासह अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. यापूर्वीच्या महापुरांमध्ये नदीकाठालगतच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचाही अनुभव आहे.

गोदावरीसह इतर नदीकाठांवरील काही गावांमध्ये नेहमी पुराचे पाणी शिरते. यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांना तातडीने बाहेर काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर असते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत रबरी बोट खरेदी करण्याची प्रक्रिया राबविली. त्या अंतर्गत या दोन बोटींची खरेदी करण्यात आली. एका बोटीची किंमत जवळपास साडेपाच लाख रुपये इतकी आहे. नाशिक शहरासाठी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित आहे. त्यांच्याकडे सहा बोट आहेत. नवीन दोन बोटी दाखल झाल्यामुळे पूरपरिस्थितीत बचाव कार्य राबविताना मदत होणार आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या दोन रबरी बोटींची पाहणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केली.

दहा नागरिकांना घेऊन जाण्याची क्षमता

एकाच वेळी दहा नागरिकांना वाहून नेण्याची या बोटीची क्षमता आहे. गतवर्षी पुराचे पाणी शिरल्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाला तीन लाकडी होडय़ांची मदत घेणे भाग पडले होते. लाकडी होडय़ांच्या तुलनेत इंधनावर चालणारी रबरी बोट अधिक सक्षमपणे मदतकार्य राबवू शकेल. गोदावरीच्या पुराचा चांदोरी व सायखेडा गावाला विळखा पडतो. यामुळे एक रबरी बोट चांदोरी येथे ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्याचा कालावधी संपुष्टात आल्यावर या बोट कार्यान्वित राहाव्यात, यासाठी तिचा बोट क्लब वा अन्यत्र वापर करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. एक बोट नाशिकमध्ये ठेवण्यात येणार असून ज्या ठिकाणी तिची आवश्यकता भासेल, तिथे तिचा वापर केला जाणार आहे.