26 September 2020

News Flash

आता पोलीस आयुक्तालयासमोरही हाणामारी

दुपारी पावणे बाराच्या सुमारास दोन-तीन युवकांमध्ये आयुक्तालयासमोर मारामारी झाली.

प्रातिनिधिक छायाचित्र

किरकोळ कारणावरून वाद

शहरातील विविध भागात टोळक्यांमध्ये झडणारे वाद काही नवीन नाहीत. परंतु, हाणामारीचे हे सत्र थेट पोलीस आयुक्तालयापर्यंत पोहोचल्याचे सोमवारी पाहावयास मिळाले. दुपारी पावणे बाराच्या सुमारास दोन-तीन युवकांमध्ये आयुक्तालयासमोर मारामारी झाली. बघ्यांची मोठी गर्दी जमली. बीट मार्शलने मध्यस्थी करून हा वाद मिटविल्याचे सांगण्यात आले.

गंगापूर रस्त्यावरील पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली. वास्तविक, गणेशोत्सव, ईद सणाच्या पाश्र्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहेत. या स्थितीत टारगट युवकांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले की काय, अशी शंका या घटनाक्रमाने निर्माण केली. या भागात शाळा-महाविद्यालय भरण्याची व सुटण्याची वेळ असल्याने विद्यार्थ्यांची नेहमीप्रमाणे ये-जा सुरू होती. यावेळी दोन युवक आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर परस्परांना भिडले. अंतर्गत वादातून शिवीगाळ व मारहाण सुरू झाली. महाविद्यालयीन विद्यार्थी व मार्गस्थ होणारे वाहनधारकही हा नेमका काय प्रकार आहे ते पाहू लागले. यामुळे बघ्याची गर्दी झाली. एका बाजूची वाहतूक थांबली. मारामारी करणाऱ्यांपैकी एकाने खिशातून काही हत्यार काढले. समोरच्यावर हल्ला करणार तेवढय़ात पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात बघ्यांची गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, हे दोन संशयित युवक कोण, त्यांच्यात कोणत्या कारणावरून वाद झाला, त्यांच्याकडे शस्त्रे कोणती होती याची स्पष्टता झाली नाही. या संदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी गाडीचा धक्का लागल्यावरून उपरोक्त वाद झाल्याचे नमूद केले. पोलीस आयुक्तालयाकडून या घटनेची माहिती बिनतारी संदेशाद्वारे देण्यात आली. बिट मार्शलने धाव घेऊन हा वाद मिटविला. तसा संदेशही संबंधितांनी दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गाडीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून थेट पोलीस आयुक्तालयासमोर हाणामारी करण्यापर्यंतची मजल युवकांनी गाठल्याचे या घटनेने दर्शविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 2:47 am

Web Title: two three youths fight in front of nashik city commissionarate
Next Stories
1 सिडकोत वीज धक्क्यांची भयमालिका
2 नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी
3 ‘मृत्यूकडे पाठ करुन जगा’
Just Now!
X