गंगापूर धरण परिसरात मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. त्यातील काही युवक इयत्ता दहावीत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सातपूर- अंबड लिंक रस्त्यावरील संजीवनगर येथे वास्तव्यास असलेले युवक मित्रांसह मंगळवारी गंगापूर धरणावर फिरण्यासाठी गेले होते. गंगावऱ्हेकडून हे पाचही मित्र धरणावर पोहोचले. सध्या धरणातील अंतर्गत भागात पाणी आहे. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेले फैजल अजिम सैय्यद हुसेन (१७) आणि मुश्ताक इत्तेफाक चौधरी (१६) यांना खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. भयभीत झालेल्या तीन मित्रांनी आरडाओरड करून स्थानिकांना मदतीसाठी बोलाविले. परंतु तोपर्यंत अंधार पडू लागला. दरम्यानच्या काळात या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली.

पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. अंधारात शोधमोहीम राबविण्यात आली. रात्री दोन वाजेच्या सुमारास दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. फिरायला गेलेल्या पाच मित्रांपैकी काही दहावीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहावीची सध्या परीक्षा सुरू असताना ते भ्रमंतीसाठी बाहेर कसे पडले, याबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

दरम्यान, गंगापूर धरण हे भ्रमंतीसाठी युवकांच्या आकर्षणाचे केंद्र असले तरी या ठिकाणी आजवर अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. वास्तविक, या क्षेत्रात पूर्वपरवानगीशिवाय प्रवेशास मनाई आहे. परंतु युवक मुख्य प्रवेशद्वाराकडून न येता खुष्कीच्या मार्गाने अनधिकृतपणे या क्षेत्रात प्रवेश करतात, असे वारंवार निदर्शनास आले आहे. या युवकांनी त्याच मार्गाचा वापर केला. पाण्यात उतरण्याचा मोह टाळला जात नाही आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे आजवर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हे क्षेत्र विस्तीर्ण स्वरूपाचे असल्याने आणि पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी पाटबंधारे विभाग हतबल आहे. या परिसरावर नजर ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित आहे. त्या आधारे बेकायदा प्रवेश करणाऱ्यांना पायबंद घातल्यास अशा दुर्घटना टाळल्या जाऊ शकतात, अशी भावना व्यक्त होत आहे.