समृद्धी महामार्गाबाबत मौन बाळगल्याने शेतकरी अस्वस्थ

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाबाबत काही महिन्यांपूर्वी कृषी संमेलन अन् खास बैठकांच्या माध्यमातून बाधीत शेतकऱ्यांच्या वेदना तन्मयतेने ऐकून त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन देणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘समृध्दी’ बाबतच्या भूमिकेत बदल झाला की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे. येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपवर तुटून पडलेल्या पवार यांनी ‘समृध्दी’च्या मुद्याला स्पर्श करणे टाळले. साहेबांच्या मौनाने बाधीत शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित नेत्यांना शेतकऱ्यांपासून तोडल्याचा आरोपही होत आहे.

प्रस्तावित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी शासन थेट जमीन खरेदी योजनेंतर्गत जमीन खरेदी करीत आहे. या महामार्गास होणारा विरोध कमी करण्यासाठी रेडिरेकनरच्या पाचपट दर निश्चित करण्यात आले. दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाला नाशिक, ठाण्यासह काही जिल्ह्यात विरोध कायम आहे. बाधीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग लक्षात घेऊन सत्ताधारी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिले होते. सध्याच्या घडामोडी लक्षात घेतल्यास शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष त्यापासून एक पाऊल मागे गेल्याची शंका शेतकरी वर्गात आहे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षातील विविध शेतकरी संघटनांच्या सोबतीने येथे राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधींचे अधिवेशन पार पडले. यावेळी कृषिमालाचे घसरलेले भाव, शेतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, कर्जमाफी अशा विविध मुद्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरत राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची ताकद दाखविण्याची वेळ आल्याचे सूचित केले. साहेब शेतकरी प्रश्नांवर सर्व काही बोलले. मात्र समृध्दीबाबत एक शब्दही न बोलल्याने शेतकरी बुचकळ्यात पडले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, या दौऱ्यात समृध्दीबाधीत शेतकऱ्यांनी पवार यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, भेट झाली नाही. काही महिन्यांपूर्वी पवार यांनी समृध्दी महामार्गाच्या प्रश्नाबाबत १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांची औरंगाबाद येथे बैठक बोलावली होती. तेव्हा दोन हजार शेतकऱ्यांनी साहेबांसमोर आपली भावना मांडली. लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या. तीन तास सर्वाचे म्हणणे जाणून घेत पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्या बैठकीची तारीखही ठरली. गावोगावातून शेतकरी जाण्यास निघाले. परंतु, ऐनवेळी ती बैठक रद्द झाली. तेव्हापासून हा विषय बाजुला पडलेला असताना आता पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांतून समृध्दीला वगळले. यामुळे मुख्यमंत्र्यांना प्रस्थापित नेत्यांना शेतकऱ्यांपासून तोडण्यात यश मिळाल्याचे समृद्धी महामार्गबाधीत शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी राजू देसले यांनी सांगितले.

असाच अनुभव यापूर्वी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या बाबत आल्याचे शेतकरी सांगतात. पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेच्यावतीने येथे आयोजित कृषी अधिवेशनात समृध्दीबाधीतांची भावना ठाकरे यांनी जाणून घेतली होती. त्यानंतर मुंबई येथे शेतकऱ्यांशी चर्चा केली. प्रस्तावित मार्गात बागायती जमिनी जाऊ नये म्हणून फेरसर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले गेले. सेना शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगण्यात आले. परंतु, नंतर हा विषय सेना नेत्यांनी पध्दतशीरपणे गुंडाळून ठेवला. महामार्गात बदल करण्याच्या दृष्टीने आजतागायत सर्वेक्षण झाले नाही. यामुळे ठाकरे यांच्यानंतर पवार यांच्याही भूमिकेत बदल झाल्याची साशंकता शेतकरी व्यक्त करीत आहे.

जमिनीला मोठा दर देण्याचे आमिष

या महामार्गास होणारा विरोध कमी करण्यासाठी रेडिरेकनरच्या पाचपट दर निश्चित करण्यात आले. दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाला नाशिक, ठाण्यासह काही जिल्ह्य़ात  विरोध कायम आहे. बाधीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग लक्षात घेऊन सत्ताधारी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिले होते.