रावसाहेब दानवेंवर उद्धव ठाकरेंचा भडिमार

तूर खरेदीच्या मुद्दय़ावरून शेतकऱ्यांना ‘साले’ असा शब्दप्रयोग करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांच्या टीकेचे मुख्य लक्ष्य ठरले. शेतकरी आता रडणार नाही तर साले म्हणणाऱ्यांची सालपटे सोलून काढणार, अशा शब्दांत ठाकरे यांनी दानवेंवर हल्ला चढविला. अधिवेशनात पहिल्या सत्रात शेतकरी प्रतिनिधींनी बळीराजाच्या व्यथा मांडल्या. या वेळी अनेकांनी दानवेंच्या विधानाचा निषेध केला.

अहिराणी भाषेत टोलेबाजी

डॉ. एस. के. पाटील यांनी अहिराणी भाषेत दानवेंवर टोलेबाजी केली. ‘साले’ या शब्दाचा मराठीत दाजी असा अर्थ होतो. दानवे आता आमचे दाजी झाले असून त्यांना आमची जमीन देत असल्याचे उपरोधिक सुरात सांगितले.

शेतकरीविरोधकांना त्यांची लायकी दाखवू

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा अस्थिकलश घेऊन राज्यात भ्रमंती करणाऱ्या सांगलीच्या विजय जाधव यांनी भाजप नेते व त्यांच्या स्वीय सहायकांकडून मिळालेले अनुभव कथन केले. नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यास गेलो असता त्यांच्या स्वीय सहायकांनी आमच्याकडे निवेदन देऊन चालते व्हा असे सांगत हुसकावले. शेतात १० रुपये गुंतवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती राबून केवळ पाच रुपये पडतात. या स्थितीत शेतकऱ्यांविरोधात विधाने करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून दिली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.

संवेदना राहिली नाही

आडगावच्या हिरामण शिंदे यांनी द्राक्ष, कांदा व तूर उत्पादकांवर कोसळलेल्या संकटाकडे लक्ष वेधले. योग्य भाव देण्याची जबाबदारी शासनाची आहे. या स्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांविषयी असभ्य शब्दाचा प्रयोग करतात. त्यांच्यात कोणतीही संवेदना राहिली नाही. त्यांचा निषेध करीत शिंदे यांनी शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात विद्यमान मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा का दाखल करू नये, असा प्रश्न विचारला.

उद्धव ठाकरे, राजू शेट्टींकडून समाचार

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या भाषणातून दानवे सुटले नाहीत. आता शेतकरी रडणार नाहीत, तर साले म्हणणाऱ्यांची सालपटे सोलून काढणार असल्याचे ठाकरे यांनी सुनावले. दानवे यांनी मध्यंतरी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्यास ते आत्महत्या करणार नाहीत, असे लिहून देण्याची मागणी केली होती. हा संदर्भ घेऊन राजू शेट्टी यांनी त्यांना फैलावर घेतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष कर्जमुक्तीसाठी आज आत्महत्या होणार नाहीत, अशी शाश्वती मागत आहेत. परंतु २०१४ मध्ये सत्ता प्राप्त केल्यानंतर भाजपचे पदाधिकारी असे रंग बदलतील, याची हमी त्यांनी दिली नव्हती, असा टोला लगावला.