युती आहे काय, नाही काय काही फरक पडत नाही.  भाजपसोबत आमची युती सत्तेसाठी नव्हे, तर केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर होती. परंतु तोही मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही. भविष्यात युती करायची की नाही हे कार्यकर्ते ठरवतील , असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले. नाशिक येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना संपली असे म्हणणारे स्वतःच संपले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत आमची युती सत्तेसाठी नव्हे, तर केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर असल्याचे स्पष्ट केले. हिंदुंची मते फुटू नयेत म्हणून आम्ही एकत्र आलो, परंतु भाजपने या मुद्यावर वेगळा मार्ग स्वीकारल्यास आमचा मार्ग वेगळा असेल. प्रत्येक प्रश्नावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्रावर कोसळलेले हे भयंकर संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पक्षभेद आणि मतभेद विसरून सर्वांनी एकजूटीने काम करण्याची गरज आहे. तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मित्राला सावध केले.  असेही ते म्हणाले.