* नाले बुजविण्यांवर कारवाई नाही * वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याचे महापौरांचे आदेश * महापालिका सर्वसाधारण सभा महापुरावरून गाजली 

नाशिक : शहरातील बहुतांश नाल्यांवर अनधिकृत बांधकामे झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले.

इतकेच नव्हे, तर २०१७ मधील शहर विकास आराखडय़ातून सर्वच नाले गायब केले गेले, याकडे लक्ष वेधत महापालिका सदस्यांनी पुराची तीव्रता वाढविण्यास नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांविरुद्ध पालिका कारवाई करत नसल्याचा आक्षेप घेतला. त्या पाश्र्वभूमीवर, नैसर्गिक नाल्यासंबंधीच्या स्थितीचा अहवाल पुढील सर्वसाधारण सभेत सादर करावा, असे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. तसेच गावठाण भागात क्लस्टर विकासाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आधीच सादर झाला असून त्याचा पाठपुरावा करण्याचेही सूचित केले.

काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी सध्या २२ पैकी केवळ तीन नाले अस्तित्वात असल्याचे नमूद केले. उर्वरित नाल्यांवर इमारती बांधल्या गेल्या. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कोटय़वधी रुपये गटार योजनेवर खर्च केले गेले. ही योजना कार्यान्वित आहे की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपचे संभाजी मोरुस्कर यांनी नैसर्गिक नाल्यांची माहिती विकास आराखडय़ातून मिळते, असे सांगितले. शहराच्या २०१७ मधील आराखडय़ात नैसर्गिक नाले गायब झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. गुरुमित बग्गा यांनीही नाल्यांवरील अनधिकृत बांधकामामुळे शहरात पाणी साचल्याचा आरोप केला.

नैसर्गिक नाल्यांवरून बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासनावर आगपाखड केली जात असतांना दुसरीकडे महापुराच्या स्थितीत कमी मनुष्यबळात पालिका यंत्रणेने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. पालिका आयुक्त, सर्व अधिकारी मदतकार्यासाठी रस्त्यावर उतरल्याचा उल्लेख करून बोरस्ते यांनी स्मार्ट सिटीचे निम्मे प्रकल्प गोदा काठावर असल्याकडे लक्ष वेधले. पुराची पूर्वसूचना देणारी यंत्रणा नसल्याचे गजानन शेलार यांनी सांगितले. शाहू खैरे यांनी गावठाण भागात जुने वाडे पडण्याच्या घटना वाढत असून ही परिस्थिती बदलण्यासाठी वाडय़ांच्या क्लस्टर अंतर्गत नव्याने बांधणी, नूतनीकरणास परवानगी देण्याची मागणी केली.

नैसर्गिक नाले गायब झाल्यामुळे महापूर

महापौर भानसी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापुराचा विषय चांगलाच गाजला. तीन आठवडय़ांपूर्वी गोदावरीच्या महापुराचा शहराला तडाखा बसला. त्या संदर्भाने कोणी पालिका प्रशासनाचे अभिनंदन केले तर कोणी नाराजी व्यक्त केली. महापुरावेळी अनेक भागांत पाणी साचले होते. पावसाचे पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले गायब झाल्याची ही परिणती आहे. मुळात, कुठल्याही नैसर्गिक नाल्यावर बांधकामाला परवानगी नसताना मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली. बांधकाम व्यावसायिकांनी नाले बुजविले. हळूहळू सर्व नाले लुप्त होऊनही पालिकेने आजवर कोणावर कारवाई केली नसल्याचा ठपका सदस्यांनी ठेवला.