28 September 2020

News Flash

बेशिस्त रिक्षाचालकांकडून सव्वाचार लाख रुपये दंड वसूल

पहिल्या दिवशी दीड हजार रिक्षांविरुद्ध कारवाई

शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई सुरू केल्यानंतर सोमवारी सकाळी शालिमार परिसर असा मोकळा झाला.

पहिल्या दिवशी दीड हजार रिक्षांविरुद्ध कारवाई

दुचाकीस्वारांना ‘हेल्मेट सक्ती’चा धडा दिल्यानंतर वाहतूक पोलिसांनी सोमवारी आपला मोर्चा बेशिस्त रिक्षाचालकांकडे वळविला. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत रिक्षाचालकांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी रिक्षाचालक पोलिसांना न जुमानता पुढे निघून गेले, तर काहींनी थेट पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. पहिल्याच दिवशी दीड हजाराहून अधिक रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये सव्वा चार लाखाहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली.

मागील आठवडय़ात वाहतूक पोलिसांनी दुचाकी स्वारांसाठी ‘हेल्मेट सक्ती’ मोहीम हाती घेतली. अवघ्या दोन दिवसात चार हजाराहून अधिक दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम सुरू असतांना अनेकांकडून दुचाकीस्वारांविरूध्द कारवाई ठीक आहे, परंतु पोलिसांसह सर्वानाच ज्यांचा बेशिस्तपणा सहन करावा लागतो, त्या रिक्षाचालकांविरुद्ध का कारवाई केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. नाशिककरांमध्ये असलेली ही ओरड लक्षात घेऊन सोमवारी पूर्वसूचना न देता वाहतूक पोलिसांनी आपला मोर्चा रिक्षाचालकांकडे वळविला. यासाठी नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, सिडको, गंगापूर रोडसह शालिमार परिसर यासह २६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मोहिमेत तीनशेहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले.

सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मोहीम सुरू झाल्याने रिक्षाचालकांनी पर्यायी मार्गाची निवड करत सुटका करून घेण्याची धडपड केली. पोलिसांनी पर्यायी मार्गही आधीच पथक तैनात करून रिक्षाचालकांची कोंडी झाली. रिक्षाचालकांना थांबवत त्यांच्याकडील परवाना आणि अन्य कागदपत्रांची तपासणी, गणवेश आहे की नाही, बिल्ला याची छाननी करण्यात आली. बहुतांश रिक्षाचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. काही रिक्षाचालकांनी पोलिसांना न जुमानता त्यांच्याशी वाद घालणे सुरूच ठेवले. यामुळे रिक्षात बसलेल्या प्रवाश्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले.

काही ठिकाणी पलायन करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांचा दुचाकीने पाठलाग करून पोलिसांनी पकडले. आपण पावती फाडली म्हणजे आता पुन्हा कारवाई होणार नाही, अशा आविर्भावात असलेल्या रिक्षाचालकांनी क्षमतेपेक्षा जास्त, काही ठिकाणी पुढे बसवून प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. काही रिक्षाचालकांनी या कारवाईचा धसका घेत मोहीम थांबेपर्यंत रिक्षा रस्त्यावर न आणल्याने शालिमारसह अन्य ठिकाणी सकाळी गर्दीच्या वेळी रिक्षाविना चौक दिसत होते.

प्रवाशांना बससेवेवर काही अंशी अवलंबून रहावे लागले. दरम्यान, सोमवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दीड हजाराहून अधिक रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये सव्वा चार लाखाहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. शहर परिसरात वाहतूक तसेच शहर पोलिसांच्या वतीने मोहीम सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 12:47 am

Web Title: unconditional autorickshaw driver in nashik
Next Stories
1 शिवकालीन शस्त्रास्त्रांसह जुनी नाणी, हस्तलिखितांचे भांडार खुले
2 मराठा आरक्षणाला पाठिंबा पण… – भुजबळ
3 हेल्मेट सक्तीची धडक मोहीम
Just Now!
X