News Flash

दीपोत्सवाने ‘अमरधाम’मध्येही उत्साह

लासलगावलगतच्या पिंपळगाव येथे स्मशानभूमीत लक्ष्मीपूजनानिमित्त दिपोत्सवाचा अनोखा कार्यक्रम साजरा झाला.

दीपावली म्हणजे फटाक्यांची आतशबाजी.. दिव्यांची आरास.. रंगीत रांगोळी हे सारे आपल्या घराच्या अंगणात. फार झाले तर सामाजिक बांधिलकी म्हणून अनाथाश्रम किंवा वृध्दाश्रमापर्यंत सर्वाची झेप. मात्र या परंपरेला फाटा देत लासलगावलगतच्या पिंपळगाव येथे स्मशानभूमीत लक्ष्मीपूजनानिमित्त दिपोत्सवाचा अनोखा कार्यक्रम साजरा झाला. स्मशानभूमीविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
लासलगावपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळगाव येथील अमरधाम विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचाराने प्रेरित होत श्रध्दा-अंधश्रध्दा यातील फरक स्पष्ट करता यावा, या उद्देशाने त्यांनी स्मशानभूमीत दिपोत्सव साजरा करण्याचा अनोखा पायंडा पाडला. पाच वर्षांपूर्वी गावातील ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येत ग्राम स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला होता.
त्यावेळी अमरधाम परिसरात घाणीचे साम्राज्य आढळून आले. कचरा, घाण, अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडीने तर परिसराला अवकळा प्राप्त झाली होती. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या संपुर्ण परिसराची स्वच्छता करत त्या ठिकाणी रोपवाटिका तयार करण्याचा प्रयत्न झाला. लहान मोठी शोभिवंत, फळा-फुलांची झाडे या ठिकाणी लावण्यात आली. या उपक्रमाची दखल घेत वन विभागाने तालुका स्तरावरील पुरस्काराने पिंपळगावला गौरविले. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी कवी शिरीष गंधे यांनी अमरधाम परिसरात आकाशकंदील लावत येथेच दिवाळी साजरी करावी, अशी संकल्पना मांडली.
त्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत अंनिसचे कार्यकर्ते शाम मोरे यांनी ती प्रत्यक्षात आणली आहे. यासाठी अमरधाम विकास समिती गठीत करण्यात आली.

५०० हून अधिक दिव्यांची आरास
समितीच्यावतीने अमरधाममध्ये दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी जय्यत तयारी केली जाते. यंदाही समिती सदस्यांच्या कुटूंबियांनी या ठिकाणी शेणाने सारवत रंगीत रांगोळी काढली. तसेच परिसरात ५०० हून अधिक दिव्यांची आरास करत संपूर्ण परीसर प्रकाशमान करण्यात आला. आकाशकंदील लावण्यात आले. सायंकाळी स्मशानभूमीतील पार्थिव ठेवण्यात येणाऱ्या चौथऱ्याचे विधीवत पूजन करत दीपोत्सव साजरा करण्यात आला. स्थानिक मंडळींची गप्पागोष्टींची मैफल रंगली असतांना बच्चे कंपनीकडून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. त्यानंतर सर्वानी एकत्र येत फराळाचा आस्वाद घेत परस्परांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:10 am

Web Title: unique diwali event celebrated at pimpalgaon crematorium on occasion of laxmipujan
Next Stories
1 अंधांच्या जीवनात स्वरांचा प्रकाश
2 नाशिकमध्ये भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन बळ
3 चोरटय़ांची दिवाळी
Just Now!
X