News Flash

अवकाळी पावसाचा जनावरांवर घाला

रविवारी जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांत ७७.५ मिलिमीटर अवकाळी पाऊस झाला.

या वेळी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

दोन बैल, गाईंसह १२ मेंढय़ा, सहा शेळ्यांचा मृत्यू, महिला जखमी
रविवारी जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांत ७७.५ मिलिमीटर अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यात अनेक घरांचे पत्रे उडून गेले. त्यात एक महिला जखमी झाली. काही ठिकाणी वीज पडून दोन बैल, एक गाय आणि १२ मेंढय़ा व सहा बक ऱ्या ठार झाल्या. काही ठिकाणी खळ्यात काढून ठेवलेला कांदा अवकाळी पावसाने भिजल्याने नुकसान झाले. कळवण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे वादळी पावसात उडून गेले. दरम्यान, अवकाळी पावसाने सोमवारी उकाडय़ात कमालीची वाढ झाली असून सायंकाळी पुन्हा त्याचे आगमन होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली.
मागील तीन ते चार महिन्यांपासून टळटळीत उन्हाच्या तडाख्याने त्रस्तावलेल्या नाशिक जिल्ह्य़ात रविवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही भागांत गारांसह पाऊस पडला, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्य़ात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात झाली. या ठिकाणी ३० मिलिमीटर पाऊस झाला. दिंडोरी तालुक्यात २४, नाशिक तालुका १३, कळवण सात, नांदगाव दोन, निफाड ०.८ अशी एकूण ७७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही तालुक्यांत पाऊस झाला नसला तरी वादळाने नुकसान केले. नाशिक तालुक्यात मौजे पाथर्डी येथे एक, चांदवड तालुक्यात मौजे खेलदरी येथे सात ते आठ घरांचे पत्रे उडाले. कळवण तालुक्यात मौजे वाडी ब्रुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रेही उडाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मौजे खेलदरी येथे उडालेले पत्रे अंगावर पडून महिला जखमी झाली.
इगतपुरी तालुक्यात मौजे धामणगाव येथे भरत गाढवे यांचा बैल वीज पडून मयत झाला. मौजे घोटी खुर्द येथे एका घराचे कौले उडाली. सिन्नर तालुक्यात मौजे सुळेवाडी येथे एक बैल, तर बारगाव पिंप्री येथे एक गाय व एक बैल वीज पडून मयत झाला. बागलाण तालुक्यातील मौजे घाने येथे १२ मेंढय़ा व सहा बक ऱ्या वीज पडून मयत झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या पावसाने उन्हाळी कांद्याचे काहीअंशी नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची काढणी करून ते खळ्यात ठेवले आहे. सध्या कांद्याला भाव नसल्याने त्यांची विक्री करूनही पदरात फारसे काही पडणार नाही असा विचार करून ते चाळीत साठवण्याचे अनेकांचे नियोजन आहे. संबंधितांचा उघडय़ावर पडलेला कांदा पावसाच्या कचाटय़ात सापडला. गारपिटीसह झालेल्या पावसाने जिल्ह्य़ाच्या वातावरणात निर्माण झालेला गारवा औट घटकेचा ठरला. रविवारी रात्रभर हवेत गारवा असला तरी सोमवारी सकाळपासून उकाडा जाणवू लागला. आदल्या दिवशी झालेल्या पावसामुळे नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक झाल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया होती. यंदा ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
मुसळधार पाऊस होईपर्यंत टंचाईच्या संकटावर तोडगा निघणे अवघड आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक दमदार पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहेत. सोमवारी प्रचंड उकाडा जाणवत होता. काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण झाल्यामुळे अवकाळी पावसाची पुनरावृत्ती होणार असल्याची शक्यता बळावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2016 3:30 am

Web Title: unseasonal rain attack on animals
टॅग : Unseasonal Rain
Next Stories
1 ‘अक्षय्य’ खरेदीसाठी ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद
2 कौटुंबिक अत्याचाराच्या वाढत्या घटना कुटुंब व्यवस्थेसाठी चिंताजनक
3 शिवसेना खासदार आणि भाजप आमदारात श्रेयाची लढाई
Just Now!
X