News Flash

नाशिक: मनमाडला अवकाळी पावसाचा तडाखा

शेतकऱ्यांचं नुकसान, जनजीवन विस्कळीत

नाशिक: मनमाडला अवकाळी पावसाचा तडाखा
अवकाळी पावसाचा तडाखा

नाशिक जिल्ह्यातील मनमाड़ शहरात रविवारी पडलेल्या अवकाळी पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले. दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पडलेल्या या पावसाने येथील नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. इथे काही भागात गारा देखील पडल्या. आठवड़े बाजार भरल्यानंतर अचानक पडलेल्या या पावसाने येथील विक्रेते व ग्राहकांची प्रचंड पळापळ झाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालं.

रविवार सकाळपासूनच ४३ अंश सेल्सियस तापमानावर गेलेल्या मनमाड शहरात सगळ्यांची उन्हाने काहिली होत होती. उन्हाच्या तडाख्याने इथले नागरिक प्रचंड हैराण झाले होते. पण दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू लागला. गेले अनेक दिवस उन्हाने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांनी अचानक पडलेल्या या पावसाचा आनंद घेतला. लहान मुलांनीही पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. शहरातील काही भागात गारा पडल्यानंतर पावसाचा जोर अचानक वाढला. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने तिथून जाणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.

आज मनमाडमध्ये पडलेल्या पावसाने इथल्या वातावरणात सुखद गारवा निर्माण झालेला असला तरी इथल्या शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा व विविध शेती उत्पादने या अवकाळी पावसात भिजली. त्यामुळे या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आज पडलेल्या या पावसामुळे शहरातील वीजपुरवठासुध्दा खंडित झाला होता.

नाशिकला २०१४ साली मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना करावा लागला. त्यावेळी हजारो, लाखो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं होतं. त्यावेळेस राज्याच्या इतरही भागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2017 10:09 pm

Web Title: unseasonal rains in manmad nashik wreak havoc
Next Stories
1 हॉलतिकीटवर पत्ता ‘नीट’ नसल्यामुळे नाशिकमध्ये विद्यार्थी चुकीच्या केंद्राकडे
2 शेतकऱ्यांची स्थिती विदारक असल्याने तातडीने मदत करा
3 गुरुदेव सेवा मंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर
Just Now!
X