18 October 2018

News Flash

हवामान बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त

नाशिकमध्ये नोव्हेंबरमध्ये तापमानाचा पारा १०.२ अंशावर पोहोचला होता.

द्राक्षाप्रमाणे कांदा पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. न

द्राक्ष, कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

ओखी चक्रीवादळाच्या सावटाखाली असलेल्या नाशिकमध्ये मंगळवारी सकाळपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरू झाल्यामुळे द्राक्ष बागायतदारांसह कांदा उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अकस्मात सुरू झालेल्या पावसाने खळ्यातील आणि वाहतुकीत असणारा कांदा भिजला असून द्राक्षबागांवर डावणी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंताग्रस्त झाला आहे.

दिवाळीनंतर थंडीचे आगमन झालेल्या नाशिकमध्ये नोव्हेंबरमध्ये तापमानाचा पारा १०.२ अंशावर पोहोचला होता. गुलाबी थंडीचे हे वातावरण सर्व पिकांसाठी पोषक होते. याआधीच्या अवकाळी पावसातून बचावलेल्या द्राक्षबागांची उत्पादकांनी निगा राखून दर्जेदार माल तयार करण्याकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु पुन्हा पडलेल्या अवकाळी पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरविल्याचे चित्र आहे.

मंगळवारी सकाळपासून नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये रिपरिप सुरू झाली. कुठे अर्धा तास तर कुठे दोन-तीन तास रिमझिम पाऊस सुरू होता. पावसाचा फारसा जोर नसला तरी द्राक्ष पिकांसाठी तो हानिकारक आहे, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. जिल्ह्यात जवळपास दोन लाख एकर क्षेत्रांवर द्राक्षांची लागवड झाली आहे. त्यातील काही बागांची काढणी सुरू आहे. काही बागा काढणीवर, काही फुलोऱ्यात आहेत. काढणीवर आलेल्या द्राक्ष घडांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्यास पुढील काळात तापमान कमी होऊन घडांना तडे जाण्याची शक्यता आहे. तसेच डावणी रोगाला तोंड द्यावे लागू शकते.

फुलोऱ्यातील बागांमध्ये फुले गळून जाणे वा कूज होण्याची धास्ती द्राक्ष उत्पादक भास्कर तपकिरे यांनी व्यक्त केली. वर्षभर जपलेल्या बागांवर अखेरच्या टप्प्यात नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने त्यांना वाचविण्यासाठी सर्वत्र औषध फवारणीचे काम सुरू झाले आहे. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे.

द्राक्षाप्रमाणे कांदा पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. नवीन लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. अनेकांनी तो खळ्यात काढून ठेवला होता. पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेक ठिकाणी हा कांदा भिजला. काही शेतकऱ्यांनी धावपळ करून तो सुरक्षित ठिकाणी नेला. वाहनातून बाजारात विक्रीसाठी नेलेल्या कांद्याला पावसाचा फटका बसला. शेतात तयार कांद्याचे पावसाने नुकसान होणार आहे. भिजल्याने तो सडण्याची धास्ती आहे. त्याच्या दर्जावरही परिणाम होणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविले आहे. भाजीपाला व तत्सम पिकांनाही फटका बसणार असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे.

द्राक्ष उत्पादकअडचणीत

गतवेळच्या पावसानंतर गाडी रुळावर येत होती. उत्पादकांनी मेहनतीने बागांची काळजी घेऊन दर्जेदार माल तयार केला. सर्व काही सुरळीत होत असताना पडलेल्या अवकाळी पावसामुळे ज्या बागा तयार आहेत, म्हणजे मण्यांमध्ये साखर उतरली आहे, त्यांना तापमान कमी झाल्यास तडा जाण्याची भीती आहे. तसेच ज्या बागा फुलोऱ्यात आहे, त्या बागांतील घडांची कूज होऊ शकते. याआधीच्या पावसाने असाच फटका बसला होता. पावसात फार जोर नसला तरी द्राक्षबागांच्या नुकसानीला तो कारक ठरू शकतो. वातावरणातील बदलांमुळे अधिकची औषध फवारणी करावी लागणार आहे.

– माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ

कांदा उत्पादकांचे दुहेरी नुकसान

नवीन लाल कांद्याची आवक वाढत असताना घसरलेले भाव आणि अवकाळी पाऊस असा दुहेरी फटका उत्पादकांना बसला आहे. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीत १५ ते २० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. अकस्मात सुरू झालेल्या पावसाने खळ्यात काढून ठेवलेला माल खराब होण्याची शक्यता आहे. काढणीवर आलेल्या मालासह वाहतुकीत असणारा मालही भिजून खराब होईल. लाल कांद्याचे आयुर्मान कमी असते. त्याची साठवणूक करता येत नाही. यामुळे आहे त्या स्थितीत तो उत्पादकांना विकावा लागेल. सध्याच्या वातावरणाने कांद्याची गुणवत्ता घसरून भावही आणखी कमी होतील. कांद्यासह द्राक्ष, भाजीपाला पिकातही असेच नुकसान सहन करावे लागणार आहे.

– जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव बाजार समिती

द्राक्ष, कांद्यासाठी हानिकारक

नाशिकमध्ये द्राक्ष आणि कांदा पिकावर अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो. द्राक्षबागा सध्या वेगवेगळ्या पातळीवर आहे. काही भागांत काढणीचे काम सुरू असून काही बागा तयार होण्याच्या तर काही फुलोऱ्याच्या टप्प्यात आहे. सध्याच्या स्थितीमुळे डावणीचा प्रार्दुभाव वाढू शकतो. तयार द्राक्ष घडांना तडे जाण्याची शक्यता आहे. पाऊस कांदा पिकाला हानिकारक ठरणार आहे. जिल्ह्यात १५ डिसेंबरपासून नवीन लाल कांद्याला सुरुवात होते. अनेक भागांत कांदा परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्यास तो खराब होण्याची शक्यता आहे.

– नरेंद्र आघाव, जिल्हा कृषी अधीक्षक

First Published on December 6, 2017 2:55 am

Web Title: untimely rains hit grape onion crop in nashik district