* गणेश मूर्तीची उंची जास्तीत जास्त तीन फूट *  प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणूक नाही *  रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरांवर भर

नाशिक : दरवर्षी अभूतपूर्व उत्साहात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवावर यंदा करोना संकटाचे सावट आहे. यामुळे जास्तीत जास्त तीन फूट आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, मिरवणूक न काढता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यावर शहरातील गणेश मंडळांचे एकमत झाले आहे. गणेश मंडळांच्या निर्णयाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी स्वागत केले.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, महानगर गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. या वेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, विजय खरात यांच्यासह गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, नगरसेवक गजानन शेलार, माजी महापौर विनायक पांडे, उपमहापौर प्रथमेश गिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.  शहरात करोनाचा कहर सुरू असून दिवसागणिक सरासरी २०० नव्या रुग्णांची भर पडत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अनेक उपाय अमलात आले असून सार्वजनिक गणेशोत्सवात भक्तांसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

सार्वजनिक गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली असून जास्तीतजास्त तीन फूट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. शासकीय नियमांचे पालन करून शहरातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मूर्ती प्रतिष्ठापना करते वेळी तसेच विसर्जनाच्या दिवशीही मिरवणूक काढली जाणार नाही. गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारे ध्वनिभिंत, ध्वनिक्षेपकांचा वापर केला जाणार नसल्याचे निश्चित करण्यात आले. गणेशोत्सव मित्रमंडळांनी टाळेबंदीच्या काळात गोरगरिबांना धान्य वाटप, मुखपट्टी वितरण, औषधोपचार आदी सुविधा पुरविल्या. गणेशोत्सवातदेखील रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरांच्या आयोजनावर भर दिला जाणार आहे. तसेच मंडळांमार्फत मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत केली जाणार आहे. उपरोक्त निर्णयांबरोबर शासनाने ठरवून दिलेले निर्णय मान्य केले जातील, असे महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे कळविले आहे.

गणेशोत्सव महामंडळाने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे, मिरवणूक न काढणे, आवाजाच्या भिंती-ध्वनिक्षेपकाचा वापर न करणे हे निर्णय स्वागतार्ह आहे. गणेशोत्सव मंडळांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृती आराखडा आचारसंहिता तयार करून संपूर्ण राज्याला नाशिक शहराचा आदर्श घालून द्यावा.

– विश्वास नांगरे-पाटील (पोलीस आयुक्त, नाशिक)