सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक पोलीस आयुक्तालय व प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहन चालवत असताना मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर बुधवारपासून (दि.५) कारवाईस सुरवात झाली. दिवसभर राबवण्यात आलेल्या या मोहिमेत चार वाहनचालकांचे तीन महिन्यांसाठी वाहन चालवण्याचे परवाने निलंबित करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. इतर एकूण १९ चारचाकी व दुचाकी वाहनचालकांकडून देखील दंड वसूल करण्यात आला. नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

विविध घटनांमध्ये वाहन चालवत असताना मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात वाढत असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला होता. अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून अशा वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानुसार नाशिक शहर पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने संयुक्तपणे ही मोहीम शहरात राबवली. त्यामुळे वाहन चालवत असताना मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांनी या मोहिमेचा धसका घेतला असून दुसरीकडे नाशिककरांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. अशा प्रकारच्या मोहिमेंमुळे अपघातांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.