शहरातील २३४ गणेश मंडळांकडून तात्पुरती वीज जोडणी

शहरातील २३४ गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृतपणे तात्पुरती वीजजोडणी घेतली आहे. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी गणेश मंडळांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरक्षेबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे प्रबोधन केले. गणेश मंडळांनी अधिकृत, तात्पुरती वीज जोडणी घेण्याबाबत आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत २३४ मंडळांनी रीतसर तात्पुरती वीज जोडणी घेतली.

यात नाशिक शहर विभाग एकमधील ८८, तर नाशिक शहर विभाग दोनमधील १४६ मंडळांचा समावेश आहे. या दोन्ही विभागात तात्पुरती वीजजोडणी शिवाय इतर, पण मीटरमधूनच वीज वापरणाऱ्या लहान गणेश मंडळांची संख्या २९० आहे.  यात विभाग एकमधील १५०, तर विभाग दोनमधील १४० मंडळांचा समावेश आहे. मुख्य अभियंता जनवीर यांच्या आदेशानुसार शहरात मंडळांकडून अवैध वीज वापराबाबत कसून तपासणी करण्यात आली. मात्र मंडळांकडून वीजचोरी होत असल्याचे कुठेही आढळून आलेले नाही. जनवीर यांनी भालेकर मैदान, गंगापूर रोड परिसरातील गणेश मंडळांना भेट देऊन पाहणी केली.

वीज मीटर, वीज अपघात होऊ  नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना यांची तपासणी करून त्यांनी सूचना केल्या. महावितरणकडून ग्राहकांसाठी पुरविण्यात आलेल्या भ्रमणध्वनी अ‍ॅप, ऑनलाइन वीजदेयक भरणा आदी सुविधांची माहिती दिली. या सुविधा स्वत: वापरण्यासोबत गणेशभक्तांचे प्रबोधन करण्याचे आवाहन त्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले.

यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम, अनिल थोरात यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्यावर्षी शहर विभाग एकमध्ये ७२ तर विभाग दोनमध्ये १२८ गणेश मंडळांनी तात्पुरती वीजजोडणी घेतली होती. त्यात यंदा ३४ मंडळांची भर पडली आहे.