दिवसभरात जेमतेम दोन हजारांचे लसीकरण, पावणेदोन लाख लसमात्रा शिल्लक

नाशिक : विभागात १८ ते ४५ वर्ष वयोगटासाठी काही मोजक्या केंद्रांवर लसीकरण सुरू झाले असताना दुसरीकडे याआधी सुरू झालेल्या गटातील प्रक्रियाही अतिशय संथपणे पुढे सरकत आहे. ४५ वर्षांपुढील गटात विभागात आतापर्यंत १८.३९ टक्के लसीकरण झाले आहे. दिवसभरात जेमतेम दोन हजार जणांचे लसीकरण होते. नाशिक जिल्ह्यत सर्वाधिक २१.९१ तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी १२.९१ टक्के लसीकरण झाले आहे. विभागात एक लाख ८२ हजार ५२३ लसमात्रा शिल्लक आहेत. तरीदेखील अनेक केंद्रांवर नागरिकांना ताटकळत रहावे लागते.

करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी आता १८ ते ४५ वयोगटासाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. तथापि, नाशिक जिल्ह्य़ात केवळ पाच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. त्यासाठी पहिल्या टप्प्यात काही दिवसांसाठी केवळ १० हजार लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. एकटय़ा नाशिक जिल्ह्यात या वयोगटातील ३० लाख व्यक्तींचे लसीकरण करावयाचे आहे. या गतीने लस उपलब्ध मिळाल्यास नेमके काय साध्य होईल, असा प्रश्न या गटाकडून उपस्थित होत आहे. अन्य जिल्ह्यत यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या गटासाठी लसीकरण सुरू करताना तत्पूर्वी ४५ वर्षांपुढील गटाचे अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक होते. परंतु, त्यातही फारशी प्रगती साधता आली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येते.

विभागात या वयोगटातील ६४ लाख ७१ हजार २०८ व्यक्तींच्या लसीकरणाचे लक्ष्य आहे. आतापर्यंत ११ लाख १३ जणांना पहिली किंवा दुसरी मात्रा दिली गेली आहे. लसीकरणाची ही टक्केवारी १८.३९ टक्के आहे. जिल्हानिहाय विचार करता नाशिक जिल्ह्यत २१८६६९७ पैकी ४७९११७ (२१.९१ टक्के), जळगाव जिल्ह्यात १४३९२८५ पैकी २०८१०२ (१४.४६), नंदुरबार ६०००१३ पैकी ७४५३६ (१२.४२), धुळे जिल्ह्यत ७२२८१५ पैकी १३५५५३ (१८.७५) आणि नगर जिल्ह्यत १५२२३९९ पैकी २९२७०५ (१९.२३) असे लसीकरण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. आता १८ वर्षांपुढील सर्व वयोगटासाठी लसीकरण सुरू झाल्यामुळे या गटासह ४५ वर्षांपुढील गटाचे लसीकरणाचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे.

पावणेदोन लाख लसमात्रा शिल्लक

लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून नाशिक विभागास आतापर्यंत एकूण १९ लाख ८६ हजार २९० लसमात्रा उपलब्ध झाल्या. यामध्ये १७ लाख ३४ हजार ३९० कोविशिल्ड तर दोन लाख ५१ हजार ९०० कोव्हॅक्सिनचा समावेश होता. विभागात आतापर्यंत १८ लाख तीन हजार ७६७ लसमात्रा वापरल्या गेल्या. सद्यस्थितीत एक लाख ८२ हजार ५२३ लसमात्रा शिल्लक आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६६ हजार ५२२, नंदुरबार १७ हजार ५६४, जळगाव ५४२, धुळे २० हजार ८२७, नगर जिल्ह्यत ७७ हजार ६८ लसमात्रा शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यतील साठा संपुष्टात आल्यात जमा असल्याने तेथील मोहीम बंद पडण्याच्या मार्गावर आहे. इतरत्र पुढील साठा येईपर्यंत काही दिवस ती सुरू राहू शकेल. विभागात दिवसभरात ४५ वयोगटापुढील गटात साधारणत: दोन हजार लसमात्रा दिल्या जातात. मागील २४ तासात आघाडीवरील यंत्रणेतील घटक आणि ४५ वर्षांपुढील गटातील व्यक्ती अशा १९६६ जणांचे लसीकरण करण्यात आले.