शहरात अपंगांच्या लसीकरणास सुरुवात; ‘आरोग्य रचना’ उपक्रमात १५ कर्णबधिर विद्यार्थ्यांचे लसीकरण

नाशिक : लसीबाबत सामान्यांप्रमाणे कर्णबधिर माजी विद्यार्थ्यांच्याही मनात अनेक शंका अन् भीती होती. त्यामुळे लस घेण्यास ते घाबरत होते. अनेकांच्या पालकांनी लस घेतलेली नव्हती. त्यांच्या शंकांचे निरसन केल्यावर काही मुले तयार झाली. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्यातून १५ कर्णबधिर विद्यार्थ्यांचे प्रथमच लसीकरण करण्यात आले. लस घेतल्यानंतर सर्व जण भलतेच खुश झाले. काहींनी केंद्रांवर छायाचित्रे काढली. कुणाला काही त्रास झाला नाही. त्यामुळे आता लसीची भीती बाळगणार नसल्याचे विश्वासाने सांगत ती आपल्या घरी मार्गस्थ झाली.

रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ‘आरोग्य रचना’ उपक्रमांतर्गत श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय आणि रचना विद्यालयात कधीकाळी शिक्षण घेणाऱ्या माजी कर्णबधिर विद्यार्थ्यांचे महाकवी कालिदास कला मंदिर केंद्रात लसीकरण करण्यात आले. या निमित्ताने महापालिकेच्या वतीने

अपंग व्यक्तींच्या लसीकरणाची सुरूवात झाली. कर्णबधिर माजी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची संकल्पना शिक्षिका अर्चना कोठावदे यांनी मांडली. संस्थेचे पदाधिकारी साहेबराव हेंबाडे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून त्यास मूर्त रूप दिले.

लस घेतली की करोना होतो, असे काहींना वाटत होते. काहींनी शिक्षिकेला तुम्ही लस घेतली नाही तर आम्हाला का सांगता, असेही प्रश्न उपस्थित केले. वेगवेगळ्या शंकाचे समाधान करीत कोठावदे यांनी त्यांच्यासमवेत लस घेण्याचे मान्य केले. अखेरीस ३० जण लस घेण्यास तयार झाले. पण त्यातील चार जणांना पूर्वी करोना झालेला होता. निकषानुसार तीन महिने त्यांना लस घेता येणार नव्हती. उर्वरितांपैकी पहिल्या टप्प्यात १५ जणांनी लस घेतली.

लसीची भीती संपुष्टात आल्याची भावना सर्वानी व्यक्त केल्याचे त्यांच्यासोबत लस घेणाऱ्या शिक्षिका कोठावदे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी महापालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, डॉ. चारूदत्त जगताप आणि डॉ. राजकुमार दायमा यांचे सहकार्य मिळाले.

या उपक्रमाच्या निमित्ताने शहरात अपंग व्यक्तींच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. संबंधितांच्या नोंदणीसाठी प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात आले. आजवर केंद्रात अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. परंतु, अपंग व्यक्तींच्या लसीकरणाची ही पहिलीच वेळ होती. त्यातून मिळालेला आनंद, समाधान शब्दात व्यक्त करता येणार नाही. लसीकरणावेळी अपंग व्यक्तींना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून सर्व काळजी घेण्यात आली. पहिल्या गटाचे लसीकरण नियोजनपूर्वक पार पडले. लवकरच दुसऱ्या गटाचे लसीकरण करण्यात येणार आहे.

– डॉ. राजकुमार दायमा (कालिदास कला मंदिर लसीकरण केंद्र)