पुनर्वसनासह सुविधांकडे दुर्लक्षाचा धरणग्रस्तांचा आरोप

तालुक्यातील वाकी खापरी धरणाचे काम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर असताना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची अनेक कामे रेंगाळलेली असून या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी धरणग्रस्तांनी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली वाकी धरणावर जाऊन सोमवारी धरणाच्या अंतिम टप्प्यात सुरू असलेले दरवाजे बसविण्याचे काम बंद पाडले.

वाकी खापरी धरण हे नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत असून या धरणाचे काम पूर्णत्वास आले असले तरी अंतिम टप्प्यात दरवाजा बसविण्याचे काम बाकी आहे. शासन व प्रशासनाने या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह, मूलभूत सुविधांची अनेक कामे, सुविधा, पैसे देणे बाकी असल्याने धरणग्रस्तांमध्ये असंतोष आहे. सर्व मागण्या पूर्ण न करता धरणाचे काम पूर्ण होत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. आधी पुनर्वसन मग धरण हे सरकारचे धोरण असतानाही तसे न करता धरणाचे काम पूर्ण होत आले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मात्र जैसे थे आहेत. शासन व प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांविषयी तसेच सोयीसुविधा मार्गी लावल्याखेरीज धरणाच्या अंतिम टप्प्यातील उर्वरित काम पूर्ण होऊ देणार नाही, असा निर्धार धरणग्रस्तांनी केला आहे.

माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी पंचायत समिती सदस्य लहानू हिंदोळे, बाजार समितीचे अनेक पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त गावातील पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी १० वाजता धरणावर जाऊन दरवाजा बसविण्याचे सुरू असलेले काम बंद पाडण्यात आले. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांविषयी शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत वाकी खापरी धरणग्रस्त पिंपळगाव भटाटा, शिंदेवाडी या गावांच्या अनेक समस्या अद्याप बाकी आहेत.

धरणाच्या अंतिम टप्प्यातील सुरू असलेले काम बंद आंदोलनप्रसंगी काशिनाथ मेंगाळ यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या सुशीला मेंगाळ, कावनईचे उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील आदी प्रकल्पबाधित शेतकरी व भूमालक उपस्थित होते.

धरणग्रस्तांच्या मागण्या

शासनाने १०० टक्के अथवा ७५ टक्के भूमिहीन असलेल्या प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबांतील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करावे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विनाअट धरणग्रस्त दाखला देण्यात यावा. पिंपळगाव भटाटा येथील शाळेच्या पाच नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम, स्वयंपाकघराचे छत, लहान मुलांसाठी खोली, पाण्याची टाकी, सरंक्षक भिंत, पिण्यासाठी पुरेशा पाणीपुरवठा योजना, पाणी साठविण्यासाठी ६० हजार लिटरची टाकी, बांधकाम केलेल्या विहिरीत संरक्षक जाळी, मोटारीसाठी पंप घर, विहिरीकडे ये-जा करण्यासाठी रस्ता, दफनभूमीची जागा निश्चित करून त्याभोवती भिंत, तसेच शिंदेवाडी ते पिंपळगाव भटाटा, गांगडवाडी, रस्ता डांबरीकरण करून देणे, धरणातून विनाअट पाणी उचलण्याची परवानगी देणे, ग्रामपंचायत कार्यालयात विद्युत जोडणी करून देणे, गावातील प्रत्येक घरासाठी शौचालय निधी उपलब्ध करून देणे, पथदीपांची दुरुस्ती अथवा नवीन बसवून देणे, अशा मागण्यांकडे धरणग्रस्तांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.