‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटीव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत सोमवारी पहिल्या दिवशी दहा एकांकिकांचे सादरीकरण झाले. आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून सहभागी असून अस्तित्व संस्थेच्या मदतीने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण विषय हाताळले. त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत..

पाऊस वाचतांना. मुडपलेलं पान

आई आजारी. वडिल अपंग. बहिण विधवा. अशा विविध कौटुंबिक अडचणींनी ग्रस्त असलेली एक युवती. यातुन बाहेर पडण्यासाठी स्वतला कामात गुंतवून घेते. अशा धीरगंभीर मुलीची गाठ एका बिनधास्त मुलाशी रेल्वे स्थानकावर पडते. जगण्यातील आनंद घे, हा आनंद पडणारा पाऊस असेल किंवा एखाद्याला दिलेला मदतीचा हात असू शकतो, असे त्याचे म्हणणे. मात्र आजवर आलेल्या अडचणींत गुरफटत राहत दुख कुरवाळण्याचा तिचा प्रयत्न. त्यांच्या संवादात नकळत डोकावणारे आजुबाजुचे लोक. जगण्याचा आनंद घे सांगणारा एका अपघातात निघून जातो. त्या त्या वेळचे प्रसंग या एकांकिकेत मांडण्यात आले आहेत.

(डे केअर कनिष्ठ महाविद्यालय)

‘लाईफ मेट्स’

स्त्री जीवना तुझी कहाणी.. स्त्री म्हणजे सोशिकता. वडिल, भाऊ, नवरा अशा वेगवेगळ्या नात्यांवर असणारे परालंबित्व. मात्र ही चौकट ओलांडत बाहेर पडण्याची तिची उर्मी जेव्हा जागृत होते तो क्षण असतो आयुष्याला भेटण्याचा. ही संकल्पना या एकांकिकेत अधोरेखीत करण्यात आली. मुग्धा, मधु, स्वराली, समीरा, सखु आणि आजी. प्रत्येकाच्या आयुष्याची वेगळी तऱ्हा. समीरा वडिलांच्या प्रसिध्दीत वाढलेली, यश, कीर्ती हातात असतांना स्वतच्या ओळखीसाठी धडपडणारी आणि ती मिळवण्यासाठी घर सोडणारी. कला जोपासतांना केवळ आर्थिक उदरभरणासाठी घराबाहेर पडलेली स्वराली, नाटय़क्षेत्रात स्थिरस्थावर होण्यासाठी घरच्यांचा विरोध झुगारत घराचा उंबरा ओलांडणारी मधु, व्यसनी नवऱ्याने घराबाहेर काढलेली सखु आणि नवऱ्याच्या संशय, सतत मारहाणीने बाहेर पडलेली, कुटूंबातील दोन विचारांचे मतप्रवाह झेलत घराबाहेर पडलेली आजी.. एका क्षणाला एकमेकांशी मैत्री आणि सहवासातून गुंफले जातात. नकळत नाती जोडत जातात, तसा नात्यातील संघर्षही सुरू होतो. हेवे दावे, आरोप प्रत्यारोपात अडकलेले नाते परत परस्परांशी कशी जुळतात यांची गुंफण करण्यात आली आहे.

(बी.वाय.के. महाविद्यालय)

ब्रेकिंग न्यूज

वृत्तवाहिनीसह वृत्तपत्रांत ठळक मथळ्याने येणारी महिलांवरील अत्याचाराची ‘ब्रेकिंग न्यूज’. त्यामुळे बदलत जाणारे समाजभान. त्याचे उमटणारे प्रतिबिंब या एकांकिकेने दर्शविले. एका चिमुरडीचे खेळतांना पडणे, तिऱ्हाईत व्यक्तींचे त्याला अत्याचार म्हणून पाहणे, काही कळण्याच्या आत चिमुरडी आणि युवकाचे बदलणारे नाते, यावर माध्यम जगतातून प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘महिलांवरील अत्याचार’ या शीर्षकाखाली येणारी एक बातमी, तिला राजकीय, सामाजिक, आर्थिक, जातीय अशा विविध माध्यमांतून लाभणारे आयाम याकडे लक्ष वेधताना एखाद्या घटनेचा ‘सामाजिक ते राजकीय’ प्रवास कसा होतो, त्यावर झोत टाकण्यात आला आहे. एका चिमुकलीवर अत्याचार या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी महिला पत्रकाराची सुरू असणारी धडपड, त्या एका घटनेमुळे गावाला अचानक मिळालेली प्रसिध्दी, त्या घटनेकडे पाहतांना आपला स्वार्थ कसा साधता येईल यासाठी सुरू असणारी प्रत्येकाची धडपड आणि दुसरीकडे त्याच वेळी माध्यमांवर राजकीय, सामाजिक येणारा दबाव. घटनेची दुसरी बाजू दडपण्यासाठी होणारा दबाव तंत्राचा वापर, यामुळे हरवलेली नितीमत्ता यावर भाष्य करण्यात आले आहे.

 (हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालय)

 

जवस

नाटक म्हटले की, डोळ्यासमोर येतो, तो झगमगाट. पण ते नाटक उभे राहण्यासाठी राबणाऱ्या हातांचा सर्वाना विसर पडतो. नाटकाचे विविध प्रकार सादर करताना, ते आकारास येतांना कलावंताची होणारी धडपड, त्यातील गंमती जंमती, नाटकाप्रती कलावंताची असणारी निष्ठा यावर या एकांकिकेत प्रकाश टाकण्यात आला. रंगभूमी नावाचा एक नाटय़वेडा संघ तात्या पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने काम करत असतो. तात्या वाक्य प्रमाण या उक्तीनुसार काम होत असल्याने वादाच्या फैरी झडतात. पण नाटक आकारास यावे ही प्रत्येकाची इच्छा. यातून एका राज्य नाटय़साठी तात्या वगनाटय़ाचा आधार घेतात. पण नाटक साफ पडते. या अपयशाने खचलेल्या तात्यांना सर्व संघ आपण राज्यनाटय़ स्पर्धा जिंकू असा विश्वास देतात. ते नाटक, त्याची संहिता काय, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

(त्र्यंबकेश्वर विद्यालय)

माय व्हॅलेंटाईन

चार चौघांसारखा संसार करतांना संसाराच्या वेलीवर अपत्य असावे,  हे सुख नियती काहींच्या ओंजळीत देते. समाजाने दिलेली दुषणे अभिमानाने मिरवायची की त्यावर मात करत बाळ दत्तक घेऊन आई-वडील होण्याचा आनंद मिळवायचा. यावर एकांकिकेत भाष्य करण्यात आले आहे. बाळ दत्तक घेतले तर भविष्यात त्या बाळावर स्वामित्वाचा हक्क कोणी दाखवू शकते. या भीतीने ग्रासलेली एक गृहिणी आणि बाळ दत्तक घेतांना जात, पात, धर्म, लिंग या पलीकडे जात त्याचा स्विकार कर यासाठी प्रेरित करणारा तिचा नवरा. अचानक त्यांच्या आयुष्यात रस्त्यावर गुलाबाची फुले विकणाऱ्या एका अनाथ मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय हे दाम्पत्य कसा घेते, हा प्रवास उलगडण्यात आला आहे.

(भोसला महाविद्यालय)

प्रारब्ध

घरात अचानक आलेला एक आगंतुक, स्वतची दहशतवादी ओळख लपवत त्या घरात राहतो. तो ज्या घरात राहतो त्याचा कुटूंब प्रमुख हा माणसातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारा असतो. कौटुंबिक कलहातुन विरक्त होत औषध निर्माणमधील एका संशोधनावर लक्ष केंद्रीत करत त्याचे प्रयत्न सुरू असतात. त्यात त्याला येणारे अपयश, कौटुंबिक अडचणी यातून तो कशी वाट काढतो, यावर लक्ष वेधण्यात आले.

(मविप्र औषधनिर्माण शास्त्र   महाविद्यालय)

लिपस्टिक

तरूणीला अचानक आलेले वैधव्य. नवरा हेच सर्वस्व असे मानत जगणारी ती त्याच्या जाण्याने जगण्यातील आनंद विसरून जाते. आजच्या आधुनिक युगातही जुने सतीचे वाण अंगीकारत तिची जीवनशैली कायम राहते.   घरातून होणारा विरोध. मित्र मैत्रीणींनी तिला या गर्तेतून काढण्यासाठी केलेले प्रयत्न. विधवा असल्यामुळे कौटुंबिक सण समारंभात मिळणारी दुय्यम वागणूक. यातुन तिने बाहेर पडत स्वतची वेगळी ओळख निर्माण करावी, असा कुटूंबाचा सुरू असलेला प्रयत्न यावर एकांकिका भाष्य करते.

(भोसला महाविद्यालय)

मजार

भारत-पाकिस्तान सीमा रेषेवर असणारा तणाव. एकमेकांविषयी असणारे समज-गैरसमज. दोन समाज घटकांमध्ये असणारी तेढ यावर या एकांकिकेत भाष्य करण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर दोन घटक वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले असले तरी आजही त्यांचे भावबंध त्या जागेशी जोडले गेले आहे. सीमारेषेवर तैनात असलेला एक सैनिक आणि अनावधानाने सीमा रेषा ओलांडून आलेली युवती. या दोघांमधील संवाद, त्यात येणारे तात्कालीन संदर्भ यावर चर्चा सुरू असतांना परस्परांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करतांना सैनिकांचा सुटलेला संयम. पण त्याचक्षणी त्याला नितीमत्ता आणि कर्तव्याची झालेली जाणीव. सैनिकाच्या भाव विश्वात असणारे ‘मजार’चे स्थान. सीमा, देश, धर्म बदलतो तसा त्या त्या वास्तुकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. ‘मजार’ श्रध्दास्थान असले तरी एखादी व्यक्तीही ‘मजार’ होऊ शकते हा संदेश यात देण्यात आला आहे.

 (क. का. वाघ संगीतशास्त्र महाविद्यालय)

वेटींग फॉर सेन्सेशन

माणुस नावाचा विचित्र प्राणी जगतांना आपल्या सभोवताली जात, धर्म, पंथ, श्रध्दा, अंधश्रध्दा याच्या भिंती बांधत एकमेकांशी भांडत राहतो. संवेदना बोथट झालेल्या जगात धर्माच्या गोष्टी सुरू असतांना एकमेकांमधील माणुसपण शोधण्याचा आणि संवाद कसा वाढवता येईल याकडे एकांकिका वेगळे विचार मांडते. श्रध्दा आणि अंधश्रध्देतील पुसटशा सीमारेषा माणसाला त्याच्याही नकळत कशा चिकटतात आणि त्यात तो कसा गुंतत जातो, हा गुंता माणुस म्हणुन कसा सुटेल यावर आस्तिक व नास्तिक या दोन मतप्रवाहातून मत प्रदर्शन करतांना संवेदना, माणुसकी किती महत्वाची हा संदेश देण्यात आला.

(के.टी.एच.एम महाविद्यालय)

१२ किमी

मोल मजुरी करत उदरनिर्वाह करणारे एक जोडपं. हाता तोंडाची गाठ पडतांना अनेक दिव्य पार पाडावे लागत असतांना कसली तक्रार नाही की खंत नाही. मोठी स्वप्ने असली तरी ती पूर्ण झाली पाहिजे, हा अट्टाहासही नाही. त्यांना कन्यारत्न प्राप्त होते. गरीबीची परिस्थिती असली तरी मुलगी सुखाने तिच्या घरी जाईल हे स्वप्न पाहत असतांना त्या माणसाची बायको जाते. तीच्या आजरापणात जमा असलेली पुंजी गेलेली असतांना तिच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी नवरा सोडुन कोणीही आले नाही. तिचे कलेवर हातात घेत तो संसारातील सुखद क्षणांची उजळणी करण्यात दंग. त्याने पायी पार केलेले अंतराची कहाणी एकांकिकेत मांडण्यात आली आहे.

(क. का. वाघ परफॉर्मिग आर्ट्स महाविद्यालय)