महापालिकेतर्फे विविध अर्थसाहाय्य योजना *  लेखी माहिती मिळाल्याने आंदोलक चकित

नाशिक : शहरातील अपंगाच्या कल्याणासाठी विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अपंगांनी बुधवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढला होता. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चेअंती यावर शिक्कामोर्तब झाले. आयुक्तांच्या या भूमिकेचे अपंगांनी स्वागत केले असून मागण्यांची दखल घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महापालिकेने प्रदीर्घ काळापासून अंध, अपंगांचा राखीव तीन टक्के निधी खर्च केलेला नाही. मागील वर्षी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे संस्थापक आ. बच्चू कडू यांनी महापालिकेत येऊन तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी कडू आणि आयुक्त यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तत्कालीन आयुक्तांनी कागदी घोडे नाचविले. अपंगांना निवृत्ती वेतन दिले जाणार असल्याचे सांगून सात हजार अपंगांचे अर्ज भरून घेतले. त्यांना अनेक खेटे मारायला लावले. घोषणांचा पाऊस पाडला. प्रत्यक्षात कोणत्याही योजना मंजूर केल्या नाही.

या संदर्भात दाद मागण्यासाठी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सर्व मोर्चेकऱ्यांना आतमध्ये प्रवेश हवा होता. या मुद्यावरून सुरक्षारक्षक आणि आंदोलक यांच्यात वाद झाले. पाच जणांच्या शिष्टमंडळाला आतमध्ये सोडण्याची तयारी दर्शविली गेली. परंतु, अपंग त्यास तयार नव्हते. यावेळी आंदोलकांनी लोखंडी प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला. अखेर १० जणांना आतमध्ये सोडून या वादावर पडदा टाकण्यात आला.

आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात चर्चा झाली. महापालिकेने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. शहरातील अपंगांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. महापालिका मुख्यालय आणि विभागीय कार्यालयात अपंगांसाठी फिरत्या खुर्चीची व्यवस्था करण्यात आली असून अंध, अपंगांसाठी फिरता दवाखाना कार्यान्वित करण्यात आला आहे. कुष्ठपीडित अपंग व्यक्तीला दरमहा १५०० रुपये अनुदान दिले जाते. २०१७-१८ वर्षांत त्यासाठी ३० लाख ५४ हजार रुपये खर्च झाले. राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानांतर्गत अंध, अपंगांचे सहा बचत गट पात्र ठरले असून त्यांना निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. तसेच श्राव्य माध्यमातील वाचनालय केले जात आहे. चौदा ठिकाणी वाचनालयाची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपंग कल्याणासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून नव्याने काही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळताच त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, असे मुंढे यांनी सांगितले. लेखी स्वरुपात आकडेवारीसह सर्व माहिती सादर झाल्यामुळे आंदोलकांचे समाधान झाले.

नव्याने राबविल्या जाणाऱ्या योजना

महापालिका अपंगांसाठी नव्याने काही योजना राबविणार आहे. त्यात कर्णबधिरांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाहाय्य, स्वयंरोजगारासाठी तसेच प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना अर्थसाहाय्य, अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी शिक्षण, प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य, विशिष्ट गरजा असणाऱ्या अपंगांसाठी योजना,त्यांना सहाय्यभूत साधणे, तंत्रज्ञान याकरिता मार्गदर्शन यांचा अंतर्भाव आहे.