समाजविघातक प्रवृत्तींवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न
महिलांना पोलीस स्थानकात येताना निर्भय वातावरण असावे यासाठी पोलिसांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. बाल सुधारालयातील बालकांना समुपदेशन करतांना त्यांना वेगळी वागणूक द्यायला नको. गतिमंद अथवा काही व्यंग असलेल्या बालक किंवा नागरिकांसाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष असावा यांसह अन्य सूचना सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून पोलीस यंत्रणेसमोर मांडण्यात आल्या. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने समाजविघातक प्रवृत्तींवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. त्या अनुषंगाने बुधवारी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.
नागरिक आणि पोलीस यांच्यात संवाद साधला जावा यासाठी पोलीस विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहेत. परिमंडल दोनअंतर्गत उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात बाल गुन्हेगारी, कर्णबधीरता, मतिमंद, महिला व बालके, व्यसनमुक्ती, समुपदेशन, सामाजिक उपक्रम आदी विषयांवर काम करणाऱ्या १८ हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. या संस्थांचे काम कसे चालते, त्याच्या कामाचे स्वरूप, पोलिसांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य, पोलीस ठाण्यात त्यांच्या काही तक्रारी प्रलंबित आहेत का, याची प्रारंभी माहिती घेण्यात आली. सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली. पोलिसांविषयी जनमानसातील भीती कमी व्हावी यासाठी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या वागणुकीत काही बदल करणे अपेक्षित आहे. यासाठी पोलिसांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी काही संस्थांनी समुपदेशन वर्ग घेण्याची तयारी दर्शविली. महिलांना अन्यायाची दाद मागण्यासाठी ठाण्यात निर्भय वातावरण लाभावे यासाठी पोलिसांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अपंग व्यक्तींसाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष असावा, काही ठिकाणी अवैधरीत्या दारूचे गुत्ते चालतात. त्या परिसरात पोलिसांनी गस्त घातल्यास परिस्थिती बदलू शकते. अतिसंवेदनशील परिसरात कायम गस्त घालणे, अनाथालयात रात्री आठनंतर बालके दाखल करताना त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, याकडे प्रतिनिधींनी लक्ष वेधले.

पोलिसांकडून सुरुवात..
पोलीस विभागाकडून संवादासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. एका क्षणात परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा नाही. मात्र या माध्यमातून पोलिसांना जे शक्य आहे, असे कामात बदल करीत स्थितीवर नियंत्रण मिळवता येईल. यासाठी पोलिसांनी तक्रार देण्यासाठी सुरू केलेला ‘व्हॉटस्अ‍ॅप’ क्रमांक संबंधित प्रतिनिधींना दिला असून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे नंबरही देण्यात आले आहेत. जेणेकरून नागरिक कधीही आपली तक्रार मांडू शकतात.
– श्रीकांत धिवरे (पोलीस उपायुक्त)

संस्था प्रतिनिधींना स्वयंसेवक करावे
पोलिसांना अपुऱ्या मनुष्यबळास तोंड द्यावे लागत आहे. यासाठी सामाजिक संस्थांमधील निवडक प्रतिनिधींना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली तर परिस्थिती बदलू शकेल. प्रदूषणाची समस्या बघता यातील एखाद्या स्वयंसेवकाने केवळ पोलिसांना माहिती दिली तरी यंत्रणा त्या वाहनाची पीयूसीसह अन्य कागदपत्रांची पाहणी करीत कारवाई करू शकेल.
– अश्पाक कागदी (मायको एम्प्लॉईज फोरम)