नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या एनआरसी, एनपीआर कायद्याविरोधात आणि चुकीच्या आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ  वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्हा परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना समज देत सोडून देण्यात आले.

शहराच्या मध्यवर्ती भागात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी व्यापारी वर्गाला  दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत फेरी काढली. काहींनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद केली. काहींना कार्यकर्त्यांनी समज दिल्याने दुकाने बंद झाली. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत दुपारी दोन पर्यंत शुकशुकाट राहिला. यावेळी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. पोलिसांना पाहताच कार्यकर्ते धूम ठोकत होते. पकडलेल्यांना पोलीस ठाण्यात नेले. त्यांना समज दिल्यानंतर सोडून देण्यात आले. बंदची पूर्वकल्पना नसल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. नाशिकरोड परिसरात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी कविता पवार, सुनिता कर्डक, शशी उन्हवणे आदी उपस्थित होते. दुसरीकडे, शहरातील पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूर परिसरात बंदचा कुठलाही परिणाम जाणवला नाही.

मनमाड शहरात बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आघाडीच्या येथील कार्यकर्त्यांनी नगरपालिकेजवळ डफ  वाजवत तीव्र निदर्शने केली. शहरातील सर्व भागात बंदचा प्रभाव जाणवला. त्यामुळे एरवी गजबजलेल्या रस्त्यांवर शुक्रवारी शुकशुकाट दिसून आला.

आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, शहराध्यक्ष पी.आर.निळे, कैलास शिंदे, यशवंत बागूल, कादीर शेख आदी यात सहभागी झाले. मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाला दिले.