व्यापाऱ्यांच्या संपाचा परिणाम
बाजार समितीतील लिलावावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा परिणाम शहरातील भाजीपाल्याचे दर वधारण्यात झाला आहे. शेतकरी बाजार समितीत भाजीपाला विक्री करत असले तरी एकंदर स्थितीचा लाभ घेण्याकडे सर्वाचा कल आहे. रोजच्या वापरातील भाज्यांसाठी दुप्पट ते तिप्पट भाव मोजावे लागत असल्याची तक्रार किरकोळ भाजी विक्रेत्यांनी केली. थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करताना तो तितकासा किफायतशीर दरात मिळत नसल्याचे काही ग्राहकांचे म्हणणे आहे. या घडामोडींमुळे महिन्याचे आर्थिक अंदाजपत्रक कोलमडणार असल्याची गृहिणींची प्रतिक्रिया आहे.
शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारात खरेदीदाराकडून आडत घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. मंगळवार हा संपाचा तिसरा दिवस. जिल्ह्य़ातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितींमधील व्यवहार या दिवशीही ठप्प राहिले. प्रारंभी पाऊस आणि व्यापाऱ्यांच्या दहशतीमुळे शेतमालाची विक्री कुठे करायची हा शेतकऱ्यांसमोरील प्रश्न होता. मात्र बाजार समिती आवारात, कुठे रस्त्याच्या कडेला दुकाने लावत त्यांनी कृषिमालाची विक्री केली. प्रशासनाने पाठिंबा दिल्याने बाजार समितीच्या आवारात पोलीस बंदोबस्तात शेतमालाची विक्री सुरू झाली. दुसरीकडे, या संपाचा फटका व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबत किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. संपामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले असून मागील आठवडय़ाच्या तुलनेत प्रति किलो ३० ते ४० रुपयांनी प्रत्येक भाजीचे दर वाढले आहेत.
किरण भालेराव यांनी किरकोळ भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मांडला. एरवी पहाटे समितीच्या आवारात आम्ही जायचो. ठरलेल्या व्यापाऱ्यांकडून काय भाजी घ्यायची ते पाहायचो. पैसे कधी असायचे, कधी नसायचे. थोडी फार घासाघीस होऊन व्यवहार व्हायचा. आता रोजचा भाजीपाला घेण्यासाठी चार-पाच ठिकाणी फेरे मारावे लागतात. त्यातही शेतकऱ्यांच्या मर्जीवर भाजीपाल्याचे भाव अवलंबून असल्याची तक्रार त्यांनी केली. संजय कर्पे या किरकोळ विक्रेत्याने त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. समितीच्या आवारातून शेतकऱ्यांकडून माल घेण्यापेक्षा व्यापाऱ्यांकडून घेणे परवडते. शेतकरी आमची अडवणूक करतात. व्यापाऱ्यांकडे वेगवेगळ्या दर्जाचा माल असतो. त्यांना तो लवकर संपवायचा असल्याने सुरुवातीपासूनच ते दर कमी ठेवतात. शेतकऱ्यांचे तसे नाही. त्यांच्याकडे ठरावीक भाज्या असतात. ते समितीच्या आवारात येतात. कोणाकडे काय माल आहे हे पाहून आपल्या मालाचा दर ठरवतात. माल कमी झाला किंवा त्याचा तुटवडा जाणवायला लागला की, शेतकरी अवाच्या सव्वा भाव वाढवतात. शेतकऱ्यांच्या मनमानीपणामुळे रोजच्या वापरातील हिरव्या मिरचीची खरेदी २०० रुपये किलोने करावी लागली. ही परिस्थिती संपामुळे अजून चिघळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
संपामुळे महिला वर्गही बेजार असून रोजच्या वापरातील पाव किलो भाजीसाठी किमान ३० रुपये मोजावे लागत आहेत. भाज्यांचे कडाडलेले भाव पाहता पर्यायी भाज्या म्हणून दाळी, उसळी याकडे अनेकांनी मोर्चा वळविला आहे. संप कशामुळे सुरू माहीत नाही. भाजीपाल्यांचे भाव वधारले असताना ही वाढीव किंमत खरेच शेतकऱ्यांना मिळते का बाजारात भाजीपाल्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली, असा प्रश्न स्मिता चंद्रात्रे यांनी केला. भाजीपाल्याचे दर वाढल्याने रोज मुलांना डब्यात काय द्यायचे आणि कोलमडणारे महिन्याचे अंदाजपत्रक कसे सांभाळायचे याची सध्या भ्रांत असल्याचे त्यांनी सांगितले. अनुजा कुलकर्णी यांनी दरवाढीमुळे रोजच्या जेवणात भाजी काय करावी, हा प्रश्न पडल्याचे नमूद केले. आधीच डाळीचे दर गगनाला भिडलेले, त्यात भाज्याही महागल्याने मध्यमवर्गीयांचे महिनाभराच्या अंदाजपत्रकावर परिणाम झाला आहे.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर
वांगे (६०-७० रुपये प्रति किलो), कारले (७०-८०), गिलके (८०), दोडके (१००), वाल (१३०-१४०), घेवडा (२००-२५०), गाजर (८०-९०), काकडी (३०-४०), टोमॅटो (१००-१२०), कोबी (८०-९०), फ्लॉवर (६०-७०), दुधी भोपळा (२० रुपये नग), बीट (८०-१००), सिमला मिरची (८०-९०), भेंडी (८०-९०), भरताचे जळगावचे वांगे (८०-१००), जांभळे वांगे (१७०), गवार (१००-१२०), गावरान गवार (१६०-१७०), सुरण (८०), डांगर (१००), कांदा पात (३०), मेथी (३० रु.जोडी), पालक (१५), शेपू (२०), कोथिंबीर (५०), तांदुळका (१०), हिरवी मिरची (२००), लवंगी मिरची (२२०), बटाटे (३०), कांदे (१२), आले (१६०), लसूण (१३०) आणि मटकी-उसळी (८० रुपये).