डिझेल दरवाढीमुळे  गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. वाहतूक खर्चात होणाऱ्या वाढीचा भार हा अंतिमत: शेतकरी वर्गासह कृषिमाल, भाजीपाला खरेदी करणाऱ्या शहरातील ग्राहकांवरच पडणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील आठवडय़ात भाज्यांचे दर आणखी वाढतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईची परसबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधून दररोज १०० ते १२५ वाहने भाजीपाला घेऊन मुंबई आणि उपनगरांमध्ये जातात. त्याचप्रमाणे येथील कांदा हा देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. वाहतूक खर्चातील वाढ गृहीत धरून व्यापारी माल खरेदी करून इतरत्र विकतो. कृषिमालाच्या व्यवहारात हा घटक स्वत:चे नुकसान होऊ देत नाही. मुंबईसह इतर शहरांत कृषिमाल विकताना डिझेल खर्चाचा भार किमतीतून वसूल केला जाईल, याकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी लक्ष वेधले. नाशिक बाजार समितीतील व्यापारी राजन शिंदे यांनीदेखील हा मुद्दा मान्य केला. पावसामुळे कृषिमालाची आवक घटलेली आहे. मुंबई, गुजरातमधून भाजीपाल्यास चांगली मागणी आहे. समितीतील ६० टक्के व्यापारी वाहनांनी कृषिमाल विक्रीला पाठवितात.

आंदोलनाचा इशारा

डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड आणि पी. एम. सैनी यांनी दिला आहे.

पुण्यातील इंधन मागणीत घट

जून महिन्यात सलग वाढलेल्या दरांमुळे पुणे शहरातील इंधनाचा खप तब्बल ३० टक्के घटला आहे. टाळेबंदी लागू करण्याआधी शहरात दररोज ३० लाख लिटर पेट्रोल, तर डिझेलचा ६० लाख लिटर खप होता. सध्या पेट्रोल आणि डिझेलचा दैनंदिन खप अनुक्रमे २१ ते २२ लाख आणि डिझेलचा खप ४० ते ४५ लाख लिटपर्यंत कमी झाला आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत शहरात पेट्रोलच्या दरात ८५ पैसे, तर डिझेलच्या दरात १.५७ रुपये वाढ झाली आहे.

टोमॅटो, गवार, वांगी दर चढे..

मुंबई-ठाण्यात किरकोळ बाजारात २५ रुपये किलोने विकला जाणाऱ्या टोमॅटोच्या दरात ३५ रुपयांनी वाढ झाली असून सध्या उत्तम प्रतीचा टोमॅटो ६० रुपये किलोने विकला जात आहे. तसेच गेल्या आठवडय़ात ६० रुपये किलोने विकली जाणारी गवार सध्या ८० रुपये किलोने विकली जात आहे. वांग्याच्या दरातही किलोमागे २० रुपयांची वाढ झाली असून उत्तम प्रतीची वांगी सध्या ८० रुपये किलोने विकली जात आहे. तर हिरव्या वाटाण्याच्या भावातही वाढ झाली असून सध्या हिरवा वाटाणा १५० रुपये किलोने विकला जात आहे.

झाले काय?

डिझेलच्या नव्या दरामुळे वाहतूक खर्च सुमारे २० टक्के वाढला आहे. मालाची विक्री करताना तो खर्च समाविष्ट केल्याशिवाय उत्पादक आणि व्यापाऱ्यांजवळ कोणताही पर्याय उरला नाही. त्यामुळे वाहतूक खर्चाच्या वाढीव रकमेचा भाजीदरांवर परिणाम होणार आहे. सध्या मुंबई-ठाण्यात टोमॅटोसह अनेक भाज्यांच्या दरांमध्ये अचानक वाढ झाली आहे.

होणार काय?

डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका हा प्रामुख्याने शेतकरी आणि ग्राहकांना बसणार आहे. बाजार समितीत कृषिमाल विक्रीस आणण्याचा शेतकऱ्याचा खर्च वाढला आहे. वाहतूक खर्चाचा विचार करूनच व्यापारी खरेदी केलेल्या मालाची इतरत्र विक्री करेल. म्हणजे ग्राहकांना तो महागात खरेदी करावा लागणार आहे.

इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे वाहतुकीचे दर वाढले आहेत. वाशी येथील बाजार समिती अथवा थेट पुणे आणि नाशिक जिल्ह्य़ातून येणाऱ्या भाज्यांचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात ही वाढ दिसून येत आहे.

– गोपीनाथ मालुसरे, भाजी व्यापारी