अनिकेत साठे

शहरातील कृषी बाजार समितीतील व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक करोनाबाधित आढळल्याने मंगळवारपासून तीन दिवस समिती बंद ठेवण्यात आली आहे. या बाजारातून दररोज साधारणत: ९० ते १०० मालमोटारी भाजीपाला घेऊन मुंबईसह उपनगरांमध्ये जातात. गुरूवापर्यंत लिलाव होणार नसल्याने भाजीपाला मुंबईला जाऊ शकणार नाही. त्याची झळ मुंबईसह आसपासच्या भागांना सहन करावी लागणार आहे.

मुंबईची परसबाग अशी नाशिकची ओळख आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश भाजीपाल्याचे लिलाव नाशिक बाजार समितीत होतात. व्यापारी माल खरेदी करून तो मुंबईसह आसपासच्या भागात पाठवतात. या बाजारातील एक व्यापारी आणि एक हॉटेल व्यावसायिकाला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. यामुळे समितीने २६ ते २८ मे या कालावधीत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची अमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. यामुळे नाशिक, मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरात काहीअंशी भाजीपाल्याचा तुटवडा भासण्याची चिन्हे आहेत. बाजार बंद होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी या समितीतून एकूण ११३ मालमोटारी भाजीपाला घेऊन विविध भागात गेल्या होत्या. त्यातील जवळपास ८८ वाहने मुंबई आणि परिसरात गेली. यामध्ये मुंबईला ३५, कल्याणला २२, ठाणे १३, दहिसर आणि भिवंडी प्रत्येकी नऊ वाहनांचा समावेश आहे.

बाजार समितीत दररोज १० हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होत आहे. समितीची दररोजची उलाढाल दोन ते अडीच कोटींच्या घरात आहे. ही उलाढाल तूर्तास थंडावली आहे. या काळात थेट बांधावरून भाजीपाला घेऊन तो पाठवता येईल. मात्र, त्यास मर्यादा असल्याचे व्यापारी सांगतात. टाळेबंदीच्या सुरूवातीला मुंबईत भाजीपाला नेतांना व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. कालांतराने हा पुरवठा सुरळीत झाला. मुंबईत भाजीपाल्यास प्रचंड मागणी आहे. बहुसंख्य शेतकरी नाशवंत माल थेट मुंबईतील ग्राहकांना विक्रीसाठी नेण्याचे टाळतो. कधी नेलाच तर तेथील स्थानिक विक्रेते त्रास देतात. विक्रीला मज्जाव करतात, असे अनुभव आहेत. त्यामुळे बाजार समितीत व्यापाऱ्याकडे माल विकणे सोयीस्कर ठरते, असे अनेक शेतकरी सांगतात.

नाशिक बाजार समितीचे व्यवहार तीन दिवस बंद राहणार असल्याने मुंबईला दररोज होणारा भाजीपाला पुरवठा होऊ शकणार नाही. व्यापारी शेताच्या बांधावर जाऊन भाजीपाला खरेदी करू शकतात. मात्र बाजार समितीत मुबलक स्वरुपात माल मिळतो, तसा बांधावर उपलब्ध होऊ शकत नाही.

संपत सकाळे, सभापती, नाशिक बाजार समिती