23 April 2019

News Flash

‘दूधकोड’पासून ‘डोंगरजिरा’वर खवय्यांचा ताव

बदलत चाललेल्या काळात समाजातील अनेक चांगल्या परंपरा, संस्कृतीचा ऱ्हास होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

महोत्सवात वैविध्यपूर्ण रानभाज्यांची ओळख; ५३ महिलांचा सहभाग

‘चवीने खाणार त्याला देव देणार’ या उक्तीचा अवलंब करत सुरगाण्याच्या शेवटच्या टोकावर गुजरात सीमेवरील रघतविहीर येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या सहयोगाने संकुल ग्रामोदय ही संकल्पना आणि रानभाजी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात डोंगर-दऱ्यांतील ‘दूधकोड’पासून ‘डोंगरजिरा’पर्यंतच्या रानभाज्या परिसरातील महिलांनी तयार केल्या होत्या. खवय्यांनी त्यांचा आनंद लुटला.

बदलत चाललेल्या काळात समाजातील अनेक चांगल्या परंपरा, संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. आदिवासी भागात उपलब्ध असलेल्या अनेक वनौषधी वनस्पती, रानभाज्या आणि औषधी गुणधर्म यांची माहिती काळाच्या ओघात लुप्त होत असताना त्याचे संरक्षण आणि संवर्धनासाठी वनवासी कल्याण आश्रमने रानभाजी महोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडली. या निमित्ताने गावकऱ्यांच्या सहकार्यातून रघतविहीर येथे महोत्सवाची आखणी झाली.

जलपूजा, वनपूजा झाल्यानंतर गावातील महिलांनी एकत्र येत रानभाज्या शिजवून ताटात सजवून कार्यक्रमस्थळी आणल्या. नाशिकच्या पाहुण्यांनी आणि इतरांनी सर्व भाज्यांची पाहणी केली. औषधी गुणधर्म विचारून माहिती करून घेतली. अनेक पदार्थाची चवही चाखली.

संकुल ग्रामोदयचे प्रकल्प समन्वयक अजित गावित यांनी प्रास्ताविक केले. या वेळी पंचायत समिती सदस्य विजय घांगाळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सहभागी महिलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे याकरिता वनवासी कल्याण आश्रम प्रदेश कार्यालयाच्या वतीने प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके देण्यात आली. परिसरातील ज्येष्ठांनी रानभाज्यांचे नाव, उपयोग, औषधी गुणधर्म, त्यांची बदललेली नावे, संवर्धनाबाबत माहिती दिली. सहभागी सर्व महिलांना वनवासी कल्याण आश्रमातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.

रानभाज्यांची मेजवानी

प्रदर्शनात परिसरातील ५३ महिलांनी सहभाग घेतला. त्यांनी केलेल्या रानभाज्यांमध्ये रुखआळू, वासती(बांबूचे), कुर्डू, खुरसनी, माठा, तरुठा, अंबाडी, करटोला, श्रीदोडा, बेल लोणचे, आंबा-करवंद लोणचे, गाठमुळे भाजी, खरशिंग भाजी, आळू-तेरा पातवड, कवदर, दूधकोड, दोडकी, फुलेरान, डोंगरजिरा, कडूकांद, अळिंबी, बाफळा चटणी, लिंबडा, डांगर, केणी, शेवगा, गोलखडा, नळभाजी अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश होता.

First Published on August 31, 2018 2:52 am

Web Title: vegetables festival in nashik