संपाच्या पहिल्याच दिवशी घाऊक दरात ३० टक्के वाढ; संपात सहभागी होण्यास शेतकरी अनुत्सुक

शेतकरी संपात मागील वेळी केंद्रबिंदू राहिलेल्या नाशिकमध्ये राष्ट्रीय किसान महासंघाने शुक्रवारपासून पुकारलेल्या देशव्यापी संपाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. संपाच्या धास्तीमुळे पहिल्या दिवशी बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्यासह कांद्याची आवक कमालीची घटली. भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढ झाली. ग्रामीण भागात एक-दोन ठिकाणी रस्त्यावर दूध ओतण्यात आले. हा अपवाद वगळता संपाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे अधोरेखित झाले.

शुक्रवारपासून पुकारलेल्या देशव्यापी संपापासून नाशिकचे शेतकरी काहीसे अलिप्त राहिले आहेत. गेल्या वेळी संपाची हाक देणाऱ्या शेतकरी आंदोलन समितीने या संपापासून अंतर राखले. समितीने अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवत संपात सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप गिड्डे-पाटील यांनी केले होते. त्यास प्रतिसाद मिळाला नाही. उलट शेतकरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीचे निवेदन आंदोलन समितीच्या पदाधिकारी अमृता पवार, हंसराज वडघुले, चंद्रकांत बनकर आदींनी जिल्हा प्रशासनाला दिले. तत्पूर्वी, शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना हुतात्मा स्मारकातील कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गतवर्षी झालेल्या शेतकरी आंदोलनात जिल्ह्य़ात आक्रमकपणे आंदोलन झाले होते. या वेळी किटलीतून दूध ओतण्याव्यतिरिक्त आंदोलन झाले नाही. मागील संपात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्या आंदोलनामुळे कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाला. दरवर्षी असे संप करून नुकसान सहन करणे परवडणारे नाही. यामुळे शेतकऱ्यांची संपात सहभागी होण्याची मानसिकता नसल्याचे अमृता पवार यांनी सांगितले.

देशव्यापी संपाबद्दल समाजमाध्यमातून वातावरण तापविले गेले. त्याचा शेतकरी वर्गाने धसका घेतला. त्याची परिणती बाजार समितीत आवक घटण्यात झाली. नाशिक बाजार समितीत शुक्रवारी नेहमीच्या तुलनेत ६० टक्के भाजीपाल्याची आवक कमी झाली. केवळ ४० टक्के माल आल्याने भाव काहीसे वरचढ राहिले.

बाजार समितीत दररोज साडेतीन ते चार कोटींची उलाढाल होते. दैनंदिन व्यवहार सुरळीत असले तरी आवक घटल्याने भाव २५ ते ३० टक्क्य़ांनी वधारल्याचे बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी सांगितले. लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी माल आणला नव्हता. सकाळच्या सत्रात केवळ १५० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला सरासरी ८५० रुपये भाव मिळाला.

कांदा भावात काही अंशी वाढ झाली. कांदा बाजारात नेण्यासाठी हमाली आणि वाहतूक खर्च करावा लागतो. त्याचा लिलाव न झाल्यास हा खर्च नाहक अंगावर पडेल, यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या दिवशी स्थितीवर नजर ठेवण्यास पसंती दिली. बाजार समितीचे व्यवहार सुरळीत झाल्याचे लक्षात आल्यावर पुढील काळात शेतकरी नेहमीप्रमाणे कृषिमाल आणतील असे चित्र आहे.

नाशिक समितीतील भाजीपाल्याची आवक आणि दर

नाशिक बाजार समितीत सकाळच्या सत्रात फळभाज्यांची आवक झाली. नेहमीच्या तुलनेत आवक ६० टक्क्य़ांनी घटल्याने भाव वधारले आहे. सकाळच्या सत्रात कोबी १०६ क्विंटल (६६५ रुपये), फ्लॉवर ३०० क्विंटल (१२५०), दोडका सहा क्विंटल (३३२५), वांगी ३० (२०००) सिमला मिरची १०४ (२५००), काकडी ४४ (१५००), कारले ६०(२५००), दुधी भोपळा (८३५) यासह डाळिंबाची ३९० क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी सहा हजार रुपये दर मिळाला. संपाच्या पाश्र्वभूमीवर, गुरुवारी शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात माल बाजारात आणला होता. शुक्रवारी भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली.