नवीन सिडकोतील कामटवाडे रस्त्यावर बुधवारी रात्री टोळक्याने वाहनांची जाळपोळ करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन चार चाकी तर तीन दुचाकी अशा एकूण पाच वाहनांचे नुकसान झाले. एका इमारतीच्या वाहनतळात पेटविलेली दुचाकी नागरिकांनी विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनाक्रमामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही महिन्यांत सिडकोमध्ये वाहन जाळपोळीचे अनेक प्रकार घडले; परंतु संशयितांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली. गुन्हेगारी टोळक्याने दहशत माजविण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
काही वर्षांपूर्वी सिडकोत टोळक्याने याच पद्धतीने ३५ ते ४० वाहने पेटवून खळबळ उडवून दिली होती. पोलिसांना धडा शिकविण्यासाठी ही जाळपोळ केली गेल्याचे नंतर तपासात निष्पन्न झाले. या घटनेपासून शहरात सुरू झालेले वाहन जाळपोळीचे सत्र आजतागायत थांबलेले नाही. बुधवारी रात्री त्याची पुनरावृत्ती झाली. मटाले मंगल कार्यालयपासून कामटवाडेकडे जाणारा मुख्य रस्ता आणि काही आसपासच्या कॉलन्यांमध्ये टोळक्याने धुडगूस घातला. मंगल कार्यालयालगत रस्त्यावर उभ्या असणाऱ्या चार चाकी मोटारीला टोळक्याने पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचा मोर्चा पुढील भागात असणाऱ्या पाटलीपुत्र इमारतीकडे वळला. या इमारतीच्या वाहनतळात असणाऱ्या काही दुचाकींना आग लावण्यात आली. अचानक धूर घरात येऊ लागल्याने रहिवासी जागे झाले आणि त्यांनी खाली धाव घेतली. सर्वानी शर्थीने प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत एका दुचाकीचे पूर्णत: नुकसान झाले होते. आगीची झळ काही अंशी इमारतीला बसली. या घटनेमुळे इमारतीसह परिसरात एकच गोंधळ उडाला. काहींनी संशयितांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला; परंतु तो अपयशी ठरला.
या ठिकाणाहून पळालेल्या टोळक्याने पुढेही काही वाहने जाळण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
गुरुवारी आ. सीमा हिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित इमारतीत वास्तव्यास असणाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. मद्यपान करून कोणी गोंधळ घालत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी संबंधितांना सांगितले. नवीन सिडकोसह शहरातील वेगवेगळ्या भागांत टवाळखोरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. यापूर्वी मद्यपान करून रात्री धुडगूस घालण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत.
सिडकोचा विचार केल्यास गेल्या वर्षभरात या पद्धतीने वाहने जाळण्याचे प्रकार घडले. त्यातील संशयित आणि टवाळखोरांच्या टोळ्या तसेच त्यांना राजाश्रय देणारे म्होरके यांच्यावर कारवाई होत नसल्याने या घटनांना पायबंद बसत नसल्याची स्थानिकांची भावना आहे.
दरम्यान, जाळपोळीच्या या घटनेमागे बुधवारी दुपारी हॉटेलमध्ये मद्यपान करताना झालेला वाद कारणीभूत असल्याचा अंदाज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.