22 October 2020

News Flash

बंद ‘स्मार्ट’ रस्त्याचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास

स्मार्ट रस्त्यांच्या कामामुळे पर्यायी मार्गावर वाहन चालविण्याची कसरत चालकांना नवीन नाही.

(संग्रहित छायाचित्र)

पूर्वसूचना न देता रस्ता वाहतुकीसाठी बंद; इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी द्राविडीप्राणायाम

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान एकतर्फी सुरू असलेला स्मार्ट रस्ता शुक्रवारी बंद करण्यात आल्याने शहराच्या वाहतूक कोंडीत भर पडली. वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा शोध घ्यावा लागल्याने इतर उपरस्त्यांवरही कोंडी झाली. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असल्याने प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता बंद केल्याचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही सोसावा लागला.

स्मार्ट रस्त्यांच्या कामामुळे पर्यायी मार्गावर वाहन चालविण्याची कसरत चालकांना नवीन नाही. परंतु, कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच त्र्यंबक नाका ते मेहेर सिग्नल हा रस्र्ता वाहतुकीसाठी बंद केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ पोलिसांनी दोरी लावत पादचाऱ्यांनाही अडथळे निर्माण केले. ही अडथळ्यांची शर्यत टाळण्यासाठी आणि शाळा तसेच कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी वाहनचालकांसह पादचाऱ्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करत द्राविडीप्राणायाम करावा लागला. दुसरीकडे, काही पादचाऱ्यांनी तसेच उत्साही कार्यकर्त्यांनी स्मार्ट रस्त्यावरून चालण्यास पसंती दिल्याने खड्डे, बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडलेले, पोलिसांची मानवी तटबंदी हे अडथळे पार करत मार्गक्रमण सुरू ठेवले. काही वाहनचालकांनी या खड्डेमय रस्त्यात गाडी नेत कुठे दुभाजकांवरून तर दुभाजकाच्या मोकळ्या जागेतून दुचाकी पुढे नेण्याची कसरत केली.

रस्ता बंद का? याची कुठलीच पूर्वकल्पना नसलेले सीबीएसच्या चौफुलीवर आले असताना कार्यकर्त्यांची गर्दी, पोलिसांची गर्दी पाहून संभ्रमात पडले. आज कुठला मोर्चा का?..न्यायालयात जायचं..जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाचे काम आहे, अशा सबबी सांगुन वाहन पुढे नेता येते का यासाठी पोलिसांशी वाद घालणे सुरू ठेवले. काहींनी मेहेर सिग्ननलजवळ दोन्ही बाजूने रस्ता बंद असलेल्या ठिकाणी आपले वाहन उभे करून पुढे जाणे पसंत केले.

रस्ता बंद असल्याने मध्यवर्ती बस स्थानक आणि ठक्कर बजारमधून बाहेर पडणाऱ्या गाडय़ा अन्य मार्गाने पुढे जात असल्याने पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी झाली. शक्तिप्रदर्शनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनीही आपली वाहने जमतील तशी स्मार्ट रस्त्याच्या मोकळ्या जागेवर कुठे बस स्थानकासह अन्य ठिकाणी लावल्याने वाहतूक कोंडीत भर पडत गेली. या वाहतूक कोंडीत निवडणुकीच्या कामासाठी बाहेर असणारी अनेक शासकीय वाहनेही अडकली. जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम रथ, भरारी पथकाच्या काही गाडय़ा जमा करायच्या असताना त्यांनाही दुपारी चारनंतर येण्याचे सांगत वाहतूक पोलिसांनी बाहेरचा रस्ता दाखविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 6:31 am

Web Title: vehicle driver smart road apk 94
Next Stories
1 जिल्ह्य़ातून १२ गुन्हेगार हद्दपार; २१ जणांविरुद्ध प्रस्ताव
2 भाजप उमेदवारांचे अर्ज भरताना सेना पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती
3 कुठे शक्ती प्रदर्शन..कुठे शांतता
Just Now!
X