मालेगावातील अजब ‘दातृत्व’

मालेगाव : वाढती रुग्णसंख्या आणि प्राणवायूचा तुटवडा यामुळे करोना उपचार व्यवस्थापन करणाऱ्या महापालिका प्रशासनाची आधीच दमछाक होत असताना महापालिकेच्या करोना रुग्णालयातील एक व्हेंटिलेटर यंत्र बेकायदेशीरपणे खासगी रुग्णालयाच्या दिमतीला दिले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हे यंत्र परत देण्यासाठी संबंधित खासगी रुग्णालय आता टाळाटाळ करत असल्याने महापालिका प्रशासनावरच मिनतवाऱ्या करण्याची वेळ आली आहे.

महापालिके तर्फे शहरातील मसगा महाविद्यालय आणि सहारा रुग्णालय या दोन ठिकाणी करोना रुग्णांवर उपचार व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णांवरील अत्यावश्यक उपचारासाठी महापालिकेने सहारा रुग्णालयात नऊ  व्हेंटिलेटर यंत्रे तैनात ठेवली होती. शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या मागणीनुसार  २५ ऑगस्ट रोजी त्यातील एक यंत्र पालिका प्रशासनातर्फे दोन दिवसांच्या मुदतीवर दिले गेले, परंतु दोन दिवसांच्या बोलीवर नेलेले हे यंत्र खासगी रुग्णालयाने अद्यापही परत न केल्याने ते मिळवण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे.

हे यंत्र परत मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे आतापर्यंत या खासगी रुग्णालयाशी तीन वेळा पत्रव्यवहार केला. संबंधित अधिकाऱ्यांनी दोन-तीनदा समक्ष जाऊन विनंतीही केली, परंतु रुग्णालयीन व्यवस्थापन त्यास बिलकू ल दाद देत नसल्याची या अधिकाऱ्यांची तक्रार आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेच्या रुग्णालयीन व्यवस्थेवर ताण पडत आहे. तसेच काही दिवसांपासून अधूनमधून प्राणवायू तुटवडय़ाच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. त्यातच एक व्हेंटिलेटर यंत्र खासगी रुग्णालयाला दिल्याने सहारा रुग्णालयांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. चार दिवसांपूर्वी तेथील एका रुग्णास अचानक व्हेंटिलेटरची निकड जाणवली तेव्हा यंत्र शिल्लक नसल्याने रुग्णालय प्रशासनाची एकच त्रेधातिरपीट उडाली. खासगी रुग्णालयाला दिलेले व्हेंटिलेटर आणण्यासाठी वाहन पाठविण्यात आले, परंतु नकार दिला गेल्याने पालिका कर्मचाऱ्यांना रिक्त हस्ते परतावे लागले. त्यामुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत अखेरीस सामान्य रुग्णालयातून एक व्हेंटिलेटर यंत्र तातडीने मागवून अत्यवस्थ रुग्णाला लावावे लागले.

सद्य:स्थितीत खासगी रुग्णालयांकडून रुग्णांच्या माथी अवाच्या सवा उपचार खर्च मारला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा वेळी पालिका रुग्णालयास अडचणीत ढकलून खासगी रुग्णालयास फुकटात व्हेंटिलेटर यंत्र देण्याचे दातृत्व दाखविणे, या रुग्णालयाने त्याद्वारे पैसा कमविणे, अशा साऱ्याच बाबी संशयास्पद आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

आता कारवाईचा बडगा

खासगी रुग्णालयाच्या विनंतीनुसार अत्यावश्यक निकड म्हणून पालिका आयुक्तांच्या आदेशान्वये दोन दिवसांसाठी हे यंत्र देण्यात आले होते. त्यानुसार ते यापूर्वीच परत मिळणे अभिप्रेत होते, परंतु तसे झाले नाही. या संदर्भात पुढील कारवाईसाठी आता आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे.

– डॉ. सपना ठाकरे (आरोग्य अधिकारी, मालेगाव महापालिका)